
कोपरगाव |प्रतिनिधी|Kopargav
पाच वर्षांपूर्वी शेतकर्यांचा संप पुकारून पुणतांब्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्य शासन व महाराष्ट्राला जागे केले होते. आता पुन्हा एकदा शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणतांबा येथेच सर्वपक्षीय शेतकरी आंदोलन सुरू झाले आहे. शेतमालाला वाजवी भाव मिळत नसल्याने राज्य शासनाचा निषेध म्हणून कष्टाने पिकविलेला पालेभाज्या, फळे नागरिकांना मोफत वाटायला सुरवात केली आहे. हे आंदोलन फार चिघळू न देता शासनाने त्वरित हालचाल करून त्रस्त शेतकर्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.
वहाडणे म्हणाले, शेतकर्यांचे संपूर्ण कुटुंब रात्रंदिवस शेतात घाम गाळून उत्पन्न करत असलेला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागतो. उत्पादन खर्चही मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. यानिमित्ताने सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष एकमेकांना आरोप करून, एकमेकांना दोष देऊन फक्त राजकारणच करतील. आता तर सनदशीर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्या शेतकरी नेत्यांना करोनाचे कारण पुढे करून नोटीसाही बजावण्यात आलेल्या आहेत.
सर्वच राजकीय पक्ष स्वतःच्या राजकारणासाठी प्रचंड गर्दी जमा करून सभा मेळावे घेताहेत. करोनाचे कारण देऊन राजकीय कार्यक्रम का रद्द केले जात नाहीत. अशा प्रकारे शेतकरी आंदोलन होऊच नये म्हणून प्रयत्न करणार्या शासन व प्रशासनाचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. खरे तर शासनाने त्वरित या आंदोलनाची, शेतकर्यांच्या मागण्यांची दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे. यानंतर राजकीय पक्षांचे नेते-पदाधिकारी येऊन आंदोलकांना भेटून पाठींबा व्यक्त करतील. एकमेकांना दोष देतील.
पण यातून निष्पन्न काहीच होणार नाही. हे आंदोलन फार चिघळू न देता शासनाने त्वरित हालचाल करून त्रस्त शेतकर्यांना दिलासा दिला पाहिजे. शेतकरी आंदोलकांना करोनाचे कारण दाखवून नोटीसा दिल्या त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांनाही नोटीस देऊन त्यांच्याही सभा मेळावे थांबवून दाखवावेत, असेही वहाडणे यांनी म्हटले आहे.