
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या सेवानिवृत्त कामगारांना राहण्यासाठी किमान दोन गुंठे जागा देण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक असे विषय पुढे आणले जातात. मात्र कामगारांना दोन गुंठे जागा देण्याचा निर्णय घेणे अत्यंत क्लिष्ट व किचकट आहे. त्यामुळे हा विषय म्हणजे गाजराचा हलवाच ठरण्याची शक्यता आहे. मात्र जागा मिळणार या आशेने गेल्या 20 वर्षांपासून वाट पाहणार्या कामगारांना अजूनही आशा आहे.
पुणतांबा येथील शेती महामंडळाच्या चांगदेवनगर मळ्याची स्थापना 25 जुलै 1963 मध्ये झाली होती. मळ्यावर त्यावेळेस चार हजार एकरपेक्षा जास्त जमीन होती. गोदावरी उजव्या कालव्याच्या पाटपाण्यामुळे या मळ्यावर तात्कालिन परिस्थितीत स्त्री व पुरुष मिळून 800 पेक्षा जास्त कामगार होते. यामध्ये कायम तसेच बदली कामगारांचाही समावेश होता. या कामगारांच्या राहण्यासाठी येथील 17, 18 व 19 चारी येथे महामंडळाच्या मालकीच्या जमिनीत व्यवस्था करण्यात आली होती.
सुरुवातीला हे कामगार पाचटाच्या कोपीत राहत होते. मात्र 1978 च्या दरम्यान 18 वाडी येथील पाचटाच्या कोप्यांना आग लागल्यामुळे महामंडळाने पत्र्याचा वापर करून त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. मात्र 1978 व 2011-12 मध्ये या मळ्यावरील अंदाजे 3200 पेक्षा जास्त जमीन खंडकरी शेतकर्यांना परत देण्यात आली. तसेच 2008 च्या दरम्यान या मळ्यावरील जमिनीची मशागत बंद करण्यात आल्यामुळे बहुतांशी कामगारांनी राजीनामे दिले. तसेच स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. अनेक कामगारांनी स्थलांतर केले. सध्या मळ्यावरील 100 पेक्षा जास्त खोल्यांमध्ये सेवानिवृत कामगारांची मुले राहतात. काहींची तर तिसरी पिढी येथे वास्तव्य करत आहे. खोल्यांना अवघे 10 रुपये भाडे आहे. कामगारांची मुले मिळेल ती कामे करून उदरनिर्वाह करतात.
या वाड्या वस्त्यावर रस्ते, वीज,पाण्याची व्यवस्था आहे. त्यातच दोन गुंठे जागा मिळणार म्हणून अनेकजण खोल्या सोडण्यास तयार नाही. विशेष म्हणजे वाड्या वस्त्याच्या जागावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. काहींनी परवानगी नसताना पक्की बांधकामे केली आहेत. चांगदेवनगर मळ्यावर रोजंदारी व आऊटसोर्सिंगसह अवधे 4 ते 5 कर्मचारी आहेत. त्यामुळे दोन गुंठे जागा देताना नेमका कोणता निकष वापरणार हे महत्वाचे आहे. दोन गुंठे जागा मिळणार म्हणून 1980-90 च्या दरम्यान सेवानिवृत्त झालेले काही कर्मचारी सुद्धा ये-जा करत आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना सर्व बाजूचा विचार होणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज संस्था, विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहे. तोपर्यंत राजकीय व्यक्ती या प्रश्नावर आश्वासने देऊन वेळप्रसंगी घोषणा करून वेळ मारून नेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी महामंडळाचे सेवानिवृत्त कामगार या विषयावर चर्चा करताना दिसून येत आहे.