पुणतांबा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त भरणार्‍या यात्रेची जय्यत तयारी

पुणतांबा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त भरणार्‍या यात्रेची जय्यत तयारी

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

श्रीक्षेत्र पुणतांबा येथे त्रिपुरा पौर्णिमा व कार्तिक स्वामी पौर्णिमेनिमित्त ग्रामपंचायतीच्यावतीने यात्रेचे नियोजन करण्यासाठी ग्रामस्थ व कार्तिक स्वामी भक्त मंडळ यांची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये भाविक भक्तांना लाईट, पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस यंत्रणा, दर्शन रांगेसाठी स्वयंसेवक इत्यादींची सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी सांगितले.

श्रीक्षेत्र पुणतांबा येथील गोदावरी नदीच्या अतिरम्य किनार्‍यावर कार्तिक स्वामी महाराजांचे अतिशय प्राचीन मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोद्धार 1664 मध्ये झालेला आहे. यालाच अहिल्यादेवी घाट असे म्हणतात. अहिल्यादेवींनी गोदातीरी सुंदर असा घाट व मंदिरे बांधलेली आहे. मंदिराजवळच आदिलशाही व निजामशाही यांचे परिसिमा निश्चित करणारे ठिकाण आहे. श्री कार्तिक स्वामी महाराज यांचे महाराष्ट्रामध्ये चार मंदिरे आहेत. त्या सर्व मंदिरामध्ये कार्तिक स्वामी देवतेची एकमुखी मूर्ती असून पुणतांबा येथे असलेल्या कार्तिक स्वामी मंदिरामध्ये सहामुखी (षष्टमुखी) मूर्ती आहे. वर्षभर या मंदिरामध्ये पूजा, आरती, कार्तिक स्वामी भक्तगण करत असतात. परंतु हे मंदिर स्त्रियांच्या दर्शनासाठी वर्षभर बंद असते. फक्त कार्तिक पौर्णिमा या दिवशीच महिलांना दर्शनाचा योग असतो.

श्री कार्तिक स्वामी मूर्तीच्या दर्शनाने सर्वांना आरोग्य, धनसंपत्ती व महिलांना सौभाग्य प्राप्त होते. त्यामुळे यावर्षी सोमवारी दुपारी 4:15 ते मंगळवारी दुपारी 4:32 पर्यंत पोर्णिमा आहे. परंतु फक्त मंगळवारी चंद्रग्रहण असल्यामुळे दुपारी 2 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी कार्तिक स्वामींचे दर्शन बंद राहणार आहे. त्यानंतर मंदिर संध्याकाळी पूजा, आरती झाल्यानंतर बुधवारपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कृतिका नक्षत्र असल्याने सर्वांसाठी दर्शनाला खुले राहील. तरी या काळात सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा व आपली मनोकामना कार्तिक स्वामी चरणी पूर्ण करावी, असे कार्तिक स्वामी भक्त मंडळातील शरद गोर्‍हे गुरु यांनी सांगितले.

ग्रामपंचायतच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त भरणार्‍या यात्रेची जय्यत तयारी सुरू केलेली आहे. मंदिर स्वच्छ करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. या बैठकीप्रसंगी सरपंच डॉ. धनंजय धनवटे, नामदेव धनवटे, शरद गोर्‍हे, नितीन भगत, अरुण बाबरे, जगदीश गगे, मनोज गुजराथी, शिवराम पवार, निलेश गायकवाड, राऊत मिस्तरी, भारत वहाडणे, जय सोमवंशी, अनिल निकम, दत्तात्रेय बोर्डे, प्रसाद उपाध्ये, सोनू धनवटे ग्रामस्थ व कार्तिक स्वामी भक्त मंडळ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com