
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
पुणतांबा रास्तापूर ग्रुप ग्रामपंचायती च्या 6 प्रभागांतील प्रभाग निहाय आरक्षण नुकतेच जाहीर झालेले आहे. त्यानुसार 17 जागांसाठी कोणकोणत्या प्रभागांत कोणते आरक्षण आहे, तसेच त्या प्रभागाची भौगोलिक रचना, त्यातील मतदार संख्या ही माहिती प्रसिद्ध झाल्यामुळे पुणतांबा गावात राजकीय पटलावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
सरपंचपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित असले तरी ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी व विरोधी गटाकडून निमित्त काढून गाठीभेटी व जनसंपर्क सुरू झालेला आहे. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालामुळे विरोधी गटातील नेते व कार्यकर्ते यांच्यात उत्साह संचारला आहे. त्यातच गणेश कारखान्याच्या निवडणुकीत पुणतांबा गटातून परिवर्तन पॅनेलच्या उमदेवारांनी ज्यादा मताधिक्य मिळाल्यामुळे त्याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीवर होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
त्यातच जल स्वराज टप्पा अंतर्गत अर्धवट असलेली पाणीयोजना, पाणी योजनेच्या कामावर सातत्याने केले जाणारे आरोप. त्यातच जलजीवन मिशन अंतर्गत साठवणूक तलावाच्या दुरुस्तीच्या कामासह आतापासून विरोधकांनी निवडणूक रणनिती ठरविण्याची सुरुवात केली आहे. गणेश कारखान्यानंतर पुढचे लक्ष्य पुणतांबा ग्रामपंचायत हे डोळ्यासमोर ठेऊन विचारपूर्वक पावले उचलली जात आहेत. तर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ तसेच सरपंच डॉ. धनजय धनवटे व त्यांचे सहकारी विकास कामाचा लेखा-जोखा तयार करून मतदारांसमोर जाण्याची शक्यता आहे.
विकास कामे पाणीपुरवठा योजनेबाबत सातत्याने केला जाणारा पाठपुरावा व चांगला जनसंपर्क या बाबी सतारूढ गटाच्या जमेच्या बाजू आहेत. प्रभागरचना जाहीर झाल्यामुळे उमेदवारांची चाचपणी दोन्ही गटाकडून केली जात आहे. पावसाळा संपल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक होणार असल्यामुळे आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. मात्र निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार यावर राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत.