पुणतांबा ग्रामपंचायतीची करपट्टी 1 कोटीच्यावर थकीत; कामगाराचे पगार रखडले

घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचे नागरिकांना सरपंच डॉ. धनवटे यांचे आवाहन
पुणतांबा ग्रामपंचायतीची करपट्टी 1 कोटीच्यावर थकीत; कामगाराचे पगार रखडले

पुणतांबा |वातोहर| Puntamba

ग्रामपंचायतीची नागरिकांकडे विविध करांची एक कोटी रुपयांपेक्षा जास्त बाकी थकलेली असल्याने ग्रामपंचायत मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे.

ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांनी थकबाकी भरून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच डॉ. धनंजय धनवटे, उपसरपंच संगीता भोरकडे ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी केले आहे.

राहाता तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाची व सर्वात मोठी पुणतांबा ग्रामपंचायत ओळखली जाते.राजकारणाला फारशा इतर संस्था नसल्याने ग्रामपंचायत भोवतीच नेहमीच राजकारण फिरत असते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाची एकहाती सत्ता असून सरपंच डॉ. धनवटे, उपसरपंच सौ. भोरकडे व सदस्यांचे विकास कामांवर विशेष लक्ष असल्याने अनेक कामे मार्गी लागली आहेत.

ग्रामपंचायतीची थकबाकी वसुली करण्यासाठी मात्र आजपर्यंत कोणत्याच गटाने धडक मोहीम राबविली नसल्याने पाणी, घरपट्टी व इतर करांच्या थकबाकीचा आकडा एक कोटी दहा लाख रुपयांच्या घरात गेल्याने ग्रामपंचायत आर्थिक संकटात आहे. याचा फटका नेहमीच कर्मचार्‍यांना वेळेवर पगार मिळत नाहीत. कर्मचारी कायम आर्थिक अडचणीत असतात. करोना लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेत ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी गावाचे करोनापासून संरक्षण, जनजागृती व्हावी, स्वच्छता, पाणीपुरवठा, जंतूनाशक फवारणी आदी कामे प्रामाणिकपणे केली.

सदर कालावधीत करवसुली नसल्याने औषध फवारणी, पाणीपुरवठा दुरुस्ती या खर्चामुळे कामगारांचे पगार थकीत आहेत. करोना योध्द्यांचे थकित पगार करण्यासाठी व दिवाळी सण गोड व्हावा यासाठी नागरिकांनी थकबाकी भरून सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. धनवटे,सौ भोरकडे व श्री. पटाईत यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com