इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे पुणतांबा ग्रामपंचायत निवडणुकीत तीव्र चुरस

इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे पुणतांबा ग्रामपंचायत निवडणुकीत तीव्र चुरस

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

राहाता तालुक्यात राजकीयष्ट्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणार्‍या पुणतांबा रास्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 18 जागासाठी 100 जणांनी अर्ज भरल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सरपंचपदासाठी 8 तर 17 सदस्यांसाठी 92 जणांनी अर्ज भरले आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे कोण कोण उमेदवार अर्ज मागे घेणार? कशा तडजोडी होणार ? याकडे तमाम पुणतांबेकरांचे लक्ष लागून आहे.

यावेळी पंचरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात होती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर काहींनी घोषणाही केल्या होत्या. मात्र त्यांना उमेदवारच मिळाले नसल्यामुळे त्या घोषणा हवेतच विरल्या आहे. विशेष म्हणजे जनसेवा मंडळाच्या एका नेत्याने स्वतंत्र पॅनेल उभा करण्याचा संकल्प केला होता. तशी जोरदार तयारी सुद्धा सुरु केली होती. मात्र हायकंमाडने डोळे वटारताच त्यांनी पॅनेलचा नाद सोडून दिला. मात्र पॅनेल तयार करण्यासाठी त्यांनी ज्यांना ज्यांना शब्द दिले होते हवा निर्माण केली होती ते तोंडघशी पडले व त्यांना तातडीने दुसरे पर्याय शोधावे लागले. या वेळेस सरपंचपदासह सदस्यासाठी अपक्षांनी ज्यादा अर्ज भरले आहे. ते सर्वांना डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदासाठी पंचरंगी तर 17 सदस्यासाठी चौरंगी लढत होती. काही अपक्ष सुद्धा निवडणूक रिंगणात होते. यावेळी नेमके काय चित्र राहिल हे येत्या 25 तारखेला स्पष्ट होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत ना. विखे प्रणित जनसेवा मंडळ, आ. काळे प्रणित लोकसेवा मंडळ, माजी आ. स्नेहलता कोल्हे प्रणित पुणतांबा विकास आघाडी हे प्रमुख तीन पॅनेल निवडणूक रिंगणात असणार हे निश्चीत आहे. अपक्षांची मोट बांधून आणखी एक पॅनेल उभा करण्यासाठी दोन दिवसापासून राजकीय खलबते सुरु आहेत. यावेळी नवीन होतकरुंना उमेदवारी मिळते की नेहमीचेच चेहरे निवडणूक रिंगणात राहणार हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. निवडणुकीत पाणी पुरवठा योजना, रस्त्याची दुरावस्था, गावठाणच्या जागेवर झालेली अतिक्रमणे, वाढलेले अवैध धंद, गुंडगिरी यासह अनेक महत्वाच्या प्रश्नावर रणकंदन होण्याची शक्यता आहे.

पुणतांब्याचा मतदार जागरूक व चाणाक्ष असल्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेण्याची शक्यता आहे. यावेळी सरपंचपद आरक्षित असून या पदासाठी तीनही पॅनेलकडून नेमक्या कोणाला उमेदवारी मिळते यावर पॅनेलचे भवितव्य पणास लागणार आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असताना ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यामुळे उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असल्यामुळे दिपावलीच्या अगोदरच परिसरात फटाक्यांची आतषबाजी होणार असून पुणतांबेकर कोणाच्या पारड्यात कौल टाकणार यावरच पुढील राजकीय गणिते अवलंबून राहणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com