पुणतांब्यात ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हालचाली सुरु

पुणतांब्यात ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हालचाली सुरु

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या पुणतांबा रास्तापूर ह्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या 2023 मध्ये होणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे.

पुणतांबा-रास्तापूर ग्रुप ग्रामपचायतच्या 17 जागासाठी27 फेब्रुवारी 2018 रोजी निवडणूक झाली होती त्यावेळी सरपंच पदाची निवडणूक थेट मतदारातून झाली होती. हा मान सरपंच डॉ. धनजंय धनवटे यांना मिळाला होता. तसेच ग्रामपंचायतीच्या 17 जागेच्या निवडणूकीत आ विखे प्रणित जनसेवा मंडळाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. 2018 च्या ग्रामपंचायत निवडणूकीत धनजंय जाधव यांची विकास आघाडी आ विखे प्रणित जनसेवा मंडळ तसेच लोकसेवा मंडळ यांच्यात तिरंगी लढत झाली होती. विशेष म्हणजे ही निवडणूक गावाच्या विकासासाठी निगडीत मुद्दे तसेच पूरक पाणीपुरवठा योजना या महत्वाच्या विषयाशी केंद्रित होती.

आजही जल स्वराज टप्पा दोन अंतर्गत जागतिक बॅकेच्या सहकार्याने अंदाजे 17 कोटी रुपये खर्चाच्या पूरक पाणी पुरवठा योजना पूर्ण झालेली नाही, ती अंतिम टप्प्यात असली तरी ती केंव्हा पूर्ण होणार व ग्रामपचायतीकडे केंव्हा हस्तांतरित होणार हा येणारा काळ ठरविणार आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप गावातील अनेक नेत्यांनी तसेच ग्रामस्थांनी केलेला आहे. तसेच ह्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी सुरु करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे योजना चौकशीच्या फेर्‍यात अडकते की काय? याबाबत सांशकता आहे.पाणीपुरवठा योजना कोणी मंजूर केली? काम कोणाच्या कालखंडात कसे झाले? या मुद्यावर आगामी ग्रामपचायत निवडणूकीत विशेष चर्चा होण्याची शक्यता आहे आगामी निवडणूकीत राजकीय समीकरणे बदलून केवळ पॅनेलमध्येच निवडणूक होण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीबाबत इच्छुकांची संख्या जास्त नसली तरी ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याच ताब्यात असावी यासाठी राजकीय नेत्यांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे आगामी निवडणूकीत मनसेकडून स्वतंत्ररित्या ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचे संकेत मिळाले आहे. आज 1 जूनपासून सुरु होणार्‍या शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन सुरु होणार आहे, हे आंदोलन संपल्यानंतर लगेचच ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या तरी विविध गट वेगवेगळ्या घटनांचे औचित्य साधून कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. गाठीभेटी संपर्क यावर भर देण्यात येत आहे केवळ ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन या हालचाली सुरु झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com