पुणतांबा गोदावरी नदीपात्रातून बेकायदा वाळूचा उपसा

पुणतांबा गोदावरी नदीपात्रातून बेकायदा वाळूचा उपसा

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

येथे गोदावरी नदीपात्र बहुतेक ठिकाणी कोरडेठाक झाल्यामुळे सध्या नदीपात्रातून दिवसाढवळ्या तसेच रात्रभर मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळूचा उपसा सुरु आहे.

अहिल्याबाई होळकर घाटाच्या समोर दक्षिण बाजूला तसेच बोरबनातही सर्रासपणे बेकायदा वाळूचा उपसा व वाहतूक सुरु आहे. योगीराज चांगदेव महाराज समाधी मंदिराच्या पूर्वेला गोदावरी नदीपात्रातून यांत्रिक साधणाच्या मदतीने बाळूचा उपसा सुरु असून पुणतांबा परिसरातून रात्रीच्या वेळी शिर्डी, राहाता, श्रीरामपूरकडे डंपरच्या साहय्याने बेकायदा वाळूची वाहतूक केली जाते. विशेष म्हणजे पुणतांबा येथे महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यांनी बेकायदा वाळूच्या उपशाबाबत कधीही ठोस कारवाई केली नाही. पुणतांबा येथे त्यांचे राहण्याचे वास्तव्यच नसल्यामुळे वाळू तस्करांना आपोआपच तस्करी करण्याची संधी मिळत आहे.

बेकायदा वाळूच्या उपशाबाबत दोनदा ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र तहसीलदार राहाता यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात यावी, असा आग्रह काही ग्रामस्थांनी घेतल्यामुळे ग्रामसभा स्थगित करण्यात आल्या होत्या. या घटनेला तीन महिने झाले मात्र तहसीलदार आले नाहीत आणि वाळूच्या उपशाबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे हजारो ब्रास वाळूचा बेकायदा उपसा झाला हे वास्तव आहे.

गोदावरी नदीपात्रातील गौण खनिजाचे संरक्षण करणे पुणतांबा ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र या बाबीकडे ग्रामस्थ व प्रशासनाचा कानाडोळा आहे. नाऊर, नायगावसह नदीकाठच्या अनेक गावातील ग्रामस्थ बेकायदा वाळूच्या उपशाला खंबीरपणे विरोध करतात. मात्र पुणतांबेकर का बघ्याची भूमिका घेतात याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तहसीलदार राहाता यांनी बेकायदा वाळूच्या उपशाबाबत ठोस व धडक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com