शेतकरी आंदोलनामुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

विरोधी पक्षाचे नेते पुणतांब्याच्या संपर्कात
शेतकरी आंदोलनामुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

शेतकरी संपाचे गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणतांबा गावातील शेतकर्‍यांनी विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी 1 जून 2022 पासून आंदोलन सुरु करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हे आंदोलन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. पुणतांब्यातील शेतकर्‍यांनी 1 जून 2017 मध्ये शेतकरी संपाचे अनोखे आंदोलन केले होते. अत्यंत नियोजनबद्ध केलेल्या या आंदोलनाचे लोण अवघ्या दोन दिवसांत महाराष्ट्रभर पसरले होते.

पुणतांब्याच्या या आंदोलनाची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने तातडीने दखल घेतली होती कारण त्यावेळी सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने शेतकर्‍यांचे आंदोलन योग्य असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावेळेस माजी मंत्री सदाभाऊ खोत तातडीने पुणतांब्यात आले होते व त्यांनी मुख्यमंत्र्यांच्यावतीने शेतकर्‍यांना चर्चेचे आमंत्रण दिले होते. त्यातच पुणतांब्यात सुरु झालेल्या आंदोलनात राजकारण सुरु झाले. एका गटाने मागण्या मान्य झाल्याने तिसर्‍या दिवशीच आंदोलन मागे घेतले.

मात्र दुसर्‍या गटाने आंदोलन काही दिवस चालू ठेवले. काही शेतकरी नेत्यांनी पुणतांब्याचे आदोलंन दुसरीकडे हायजॅक केले. मात्र शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसह अनेक मागण्या मा फडणवीस सरकारने मान्य केल्या हे आंदोलनाचे यशच मानावे लागले. विशेष म्हणजे आंदोलन संपल्यावर काही महिन्यांनी पुणतांब्याच्या शेतकर्‍यांचे आभार व्यक्त करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः पुणताब्यांत येवून जाहीर सभा घेऊन शेतकरी संपाच्या आंदोलनाचे जाहिर कौतुक केले. सभा संपल्यानंतर आंदोलनाचे प्रमुख नेते धनजंय जाधव यांच्या वस्तीवर सुद्धा ते गेले होते.

श्री. जाधव यांना त्यांनी आंदोलनाबाबत शाबासकी दिली होती. आता पाच वर्षाच्या कालावधीनंतर पुणतांब्यातील शेतकर्‍यांनी 1 जूनपासून पुन्हा शेतकर्‍यांच्या विविध प्रश्राकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. योगायोगाने 2017 च्या शेतकरी संपाच्या आंदोलनाला पांठिबा देणारे उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री आहेत व माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत. महाविकास आघाडीवर टिका करण्याची ते एकही संधी सोडत नाही. त्यामुळे विरोधी पक्षाला पुणतांबा येथील शेतकर्‍यांचे आंदोलनाचे आयते कोलित मिळाले आहे. त्यातच भाजपा पक्षश्रेष्ठीनी अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी फडणवीस यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे फडणवीस या आंदोलनाची दखल घेणार नाही असे नाही.

पुणतांब्यातील शेतकर्‍यांनी गटबाजी विसरून पुन्हा 10 दिवसात हे आंदोलन सुरु करण्याचा संकल्प केला आहे. 2017 प्रमाणे आंदोलन लगेचच राज्यभर पसरेल हे म्हणणे धाडसाचे ठरेल. मात्र विरोधी पक्षाने यात लक्ष घातले तर चित्र बदलण्याची शक्यता आहे. मात्र पुणतांबेकरांना या प्रश्नात राजकारण व बाहेरच्या व्यक्ती संघटना पक्ष यांचा हस्तक्षेप येऊ द्यावयाचा नाही. मात्र शासनावर दबाव येण्यासाठी काही तरी धडक कृती करण्याची गरज आहे. आंदोलनाच्या तीव्रतेवरच त्याचे यश अवलंबून राहिल, असे असले तरी कालपासून राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पुणतांब्याच्या आंदोलनाची सविस्तर माहिती घेणे सुरु केले आहे. आंदोलन सुरु झाल्यावर काही नेते पुणतांब्याला भेट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com