पुणतांब्यात अतिक्रमणे काढण्याबाबत नोटीसा

कोपरगाव-श्रीरामपूर-राहुरी फॅक्टरी रस्ता रुंदीकरण || व्यापारी वर्गात खळबळ || अतिक्रमण काढू नये म्हणून व्यापार्‍यांचे प्रयत्न
पुणतांब्यात अतिक्रमणे काढण्याबाबत नोटीसा

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कोपरगाव येथील कार्यालयामार्फत पुणतांबा येथील स्टेशन रोडवरील 100 पेक्षा जास्त व्यावसायिकांना अतिक्रमण काढण्याबाबत लेखी नोटीस दिल्यामुळे स्टेशन रोडवरील बहुतांशी टपरीधारक गाळेधारकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. सदरच्या नोटीसा कोपरगाव-श्रीरामपूर-राहुरी फॅक्टरी या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर नोटीसा दिल्या जात असल्याची चर्चा गावात सुरु होती.

जेऊर कुंभारी, शिंगवे-पुणतांबा-श्रीरामपूर या राज्यमार्ग क्रमांक 36 वरील कि. मीटर 18 ते 19 या टप्प्यामधील व्यावसायिकांनी रिबन डेव्हलपमेंट नियमांचा भंग केल्याचे पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे संबधितांनी नोटीस मिळाल्या पासून 15 दिवसाच्या आत सर्व अतिक्रमणे तातडीने काढून टाकावीत अन्यथा मुदत संपल्यानंतर सदरहू अतिक्रमणे सरकारी खर्चाने काढून त्याचा बोजा संबधितावर टाकण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख नोटीस मध्ये केलेला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ निर्माण झाली असून अनेकांनी अतिक्रमणे काढू नये म्हणून अधिकार्‍यांवर वरिष्ठपातळी वरून दबाव आणण्याचे काम सुरु केले आहे.

विशेष म्हणजे पुणतांबा येथील स्टेशन रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्यामुळे रस्ता अत्यंत अरुंद झालेला आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच रेल्वे फाटक बंद झाल्यावर वाहतुक कोंडीचा प्रश्र दिवसेेंदिवस जटील होत चाललेला आहे. अतिक्रमणामुळे प्रवाशी, वाहनचालक यांचे व्यावसायिकाबरोबर वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. पुणतांबा येथे नुकतीच कामिका एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरली होती. यात्रेच्या दिवशी स्टेशनरोड तसेच रेल्वे फाटकाच्या पूर्व बाजूला श्रीरामपूर रोडकडे जाणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

वाढत्या अतिक्रमणाबाबत काही नेत्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर धडक आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या वेळेस सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत कारवाई केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान काही व्यापारी वर्गाने आपले शेड छोटे अतिक्रमण काढण्याची मानसिक तयारी केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत अशा नोटीसा नेहमीच येत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे, म्हणून फार गांभीर्याने घेतलेले नाही.

मात्र या राज्य मार्गावर रस्त्याच्या मध्यभागापासून दुतर्फा 50 फूटापर्यंत अतिक्रमण करणे कायदेशीर गुन्हा असून संबधितावर कारवाई करण्यात येईल, असे फलक पुणतांबा येथे लावलेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कोपरगाव कार्यालयामार्फत नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

कोपरगाव-श्रीरामपूर-राहुरी फॅटरीपर्यंत या राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम मार्गावरील बर्‍याच ठिकाणी सुरु असून पुणतांबा येथील अतिक्रमण हटवून या राज्यमार्गाचे रुंदीकरण करण्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीसा पाठविल्या असतील तर पुणतांबा येथील अतिक्रमण काढावेच लागणार आहे. त्यामुळे यावेळी पाठविलेल्या नोटीसामुळे व्यापार्‍यांना अतिक्रमण काढावेच लागतील. त्यामुळेही व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com