पुणतांब्यात बांधावर ई-पीक पाहणी उपक्रम सुरू

पुणतांब्यात बांधावर ई-पीक पाहणी उपक्रम सुरू

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या पुणतांबा रास्तापूर शिवारात माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा अंतर्गत कामगार तलाठी सोमनाथ शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी शेतकर्‍याच्या बांधावर जाऊन ई पीक पाहणी या नव्या सुविधेचा उपक्रम सुरू केला असून त्यास शेतकरी वर्गाकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नवीन सुविधेमुळे शेतकर्‍यांना आपल्या पीक पाहणीची नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात चकरा मारण्याची गरज राहणार नाही. ज्या शेतकर्‍यांकडे अँड्राईड मोबाईल आहे अशा शेतकर्‍यांनी प्रथम ई पीक पाहणी हे अ‍ॅप डाऊनलोड करावयाचे आहे. नंतर ई पीक पाहणी नोंदणी या ऑप्शनमध्ये जायचे आहे. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक नोंदवून आपला जिल्हा, तालुका व आपले गाव निवडायचे आहे. त्यानंतर खातेदाराचे प्रथम पहिले नाव नंतर मधले नाव व आडगाव अशी नोंद करावयाची आहे.

त्यानंतर खाते क्रमांक किंवा गट क्रमांकाची निवड करून गटातील खातेदाराची निवड करावयाची आहे. आपण नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी टाकून मोबाईलमध्ये परिचय पिकाची नोंदणी, झाडांची नोंदणी पीक माहिती नोंदवा इ. पर्याय आल्यावर त्यात पिकांची माहिती हे ऑप्शन आल्यावर त्यात खाते क्रमांक, गट क्रमांक, क्षेत्र, पोटखराबा, हंगाम उपलब्ध क्षेत्र, जल सिंचनाचे क्षेत्र, जल सिंचनाची पध्दती, लागवडीचा दिनांक याची नोंद करून ते सादर केल्यानंतर पिकाचा ई कॅमेर्‍याद्वारे फोटो काढून नंतर अपलोड हे ऑप्शन क्लीक करून पिकांची नोंदणी करावयाची आहे.

ही नोंदणी शासन दरबारी ऑनलाईन दिसणार असून तलाठी कार्यालयाकड्न संमती मिळाल्यावर पीक पाहणीची नोंद होणार आहे, असेही कामगार तलाठी श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे शासनाकडे पीक पाहणीची अद्ययावत माहिती गोळा होणार असून शेतकर्‍यांना सुद्धा अशा प्रकारच्या नोंदीमुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com