पुणतांब्यात : दशक्रियाविधी बंद असल्याने भात व पाण्याची व्यवस्था

अस्वस्थ कावळ्यांना दिला चांगदेव देवस्थानने आधार
पुणतांब्यात : दशक्रियाविधी बंद असल्याने भात व पाण्याची व्यवस्था

पुणतांबा | Puntamba

धार्मिक कार्यक्रम व दशक्रियाविधीच्या माध्यमातून पुणतांब्यातील अर्थचक्र बर्‍यापैकी चालते. विधी बंद झाले तर कावळे स्थलांतरणाची शक्यता आहे. त्यासाठी श्री. मुरुदगण व कृष्णा भालेराव यांनी करोना निर्बंध उठेपर्यंत कावळ्यांना दररोज सकाळी 7 वाजेच्या दरम्यान भात व पाण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच देवस्थान भाविकांसाठी बंद आहे. मात्र देवस्थानच्या परिसरात येणार्‍या मुके प्राणी, निराधार व्यक्ती यांना मदत करण्याचा संकल्प केला आहे.

महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र पुणतांबा या धार्मिक स्थळाला ऐतिहासिक व पौराणिक परंपरा आहे. योगीराज चांगदेव महाराज यांचे समाधी स्थळ व उत्तर वाहिनी गोदावरी नदी असल्यामुळे येथे वर्षभर नदीकाठी विविध धार्मिक कार्यक्रम व दशक्रिया विधी केले जातात त्यामुळे येथे कावळ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून येथील करोना समितीने धार्मिक कार्यक्रम व दशक्रियाविधीवर बंदी आणली असून त्याचा परिणाम काल पासूनच जाणवू लागला आहे.

काल सकाळीच ग्रामपंचायत कर्मचारी विठ्ठल घाटावर होते तसेच कोणताही धार्मिक विधी नव्हता. त्यामुळे नेहमीची सवय असलेल्या कावळ्यांना माणसांची गर्दी दिसली नाही व विधीच्या माध्यमातून मिळणारे अन्नही दिसेनासे झाल्यामुळे कावळ्यांनी कावकाव करण्यास सुरुवात केली. त्यांची जवळच भटकंती सुरु झाली. कावळे कशामुळे अस्वस्थ झाले याचा अंदाज योगीराज चांगदेव महाराज देवस्थानचे विश्वस्त महेश मुरुदगण व कृष्णा भालेराव यांना आला. त्यांनी लगेच अर्धा किलो तांदळाचा भात करून पत्रावळीवर नदीपात्रात तीन ठिकाणी ठेवला. भात ठेवता क्षणीच कावळ्यांनी एकत्र येऊन त्यावर ताव मारला. आठ वाजेपर्यंत सर्व कावळे शांत झाले.

हिन्दू संस्कृतीत कावळ्यांना दशक्रियाविधी व पितर जेऊ घालण्याच्या दिवशी महत्वाचे स्थान असते. पिंडदानाला स्पर्श केल्याशिवाय तसेच पितराचा नैवैद खाल्ल्याशिवाय मुक्ती मिळत नाही अशी आख्यायिका आहे. संत ज्ञानेश्वर यांनी झानेश्वरी ग्रंथात सुद्धा विरहानी अंभगात पैल तो गे काऊ कोकताहे । शकू नगे मात्र सांगतसे ॥ उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मठीन पाऊ ॥ पाहुणे पंढरीराऊ घरा कै येती असा संदर्भ देऊन विरहणीत पाडुरंगाच्या दर्शना ओढ लागली असल्याचा त्यातून सूचित केले होते.

करोनामुळे माणसावर संकटे आली आहेत ती दूर होऊ शकतात पण पशु, प्राणी, पक्षी यांच्यावर सुद्धा गंडांतर आले आहे. त्यांना आधार देण्याची गरज आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com