पुणतांब्यात करोनाचा शिरकाव

तीन दिवस संपूर्ण गाव लॉकडाऊन : डॉ. धनवटे
पुणतांब्यात करोनाचा शिरकाव

पुणतांबा|वार्ताहर|Puntamba

राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या पुणतांबा गावात काल सकाळी करोनाचे 2 रुग्ण आढळल्यामुळे 25 हजार लोकसंख्येच्या गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान काल 5 वाजता करोना समितीच्या बैठकीत पुणतांबा आजपासून 3 दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सरपंच डॉ. धनंजय धनवटे व ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी दिली.

करोना समितीच्या बैठकीत अ‍ॅड. मुरलीधर थोरात, सुधाकर जाधव, सुभाष वहाडणे, विजय धनवटे, सर्जेराव जाधव, बाळासाहेब भोरकडे, नामदेवराव धनवटे, सदाशिव वहाटोळे, बाळासाहेब चव्हाण, संदीप लाळे, सर्कल चंद्रशेखर कुलथे, तलाठी दिलीप कुसळकर, आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचारी फिजिकल डिस्टन्स ठेऊन उपस्थित होते.

काल पुणतांबा येथील शिर्डी रोड व गावातील कोपरगाव रोडलगत असलेल्या मल्हारवाडी भागात सापडलेल्या करोना रुग्णांबाबत प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलली असून मल्हारवाडी भाग शासनाच्या नियमानुसार कन्टेन्मेंट झोन जाहीर केला जाईल. तसेच ज्या रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी करून अहवाल आल्यानंतर योग्य ती कडक कारवाई करण्याचे सुतोवाच सरपंच डॉ. धनवटे व ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी केले.

पुणतांबा परिसरात 35 व 50 वर्षीय दोन व्यक्ती कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत. पुणतांबा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सरपंच डॉ. धनंजय धनवटे, उपसरपंच संगीता भोरकडे, ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य, समाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था यांनी योग्य नियोजन करून गावातील ग्रामस्थांना करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही यापासून प्रतिबंध केला होता. परंतु आता दोन रुग्ण सापडले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत प्रशासनाने या दोघांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे, असे डॉ. कुंदन गायकवाड यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com