पुणतांब्याच्या आषाढी एकादशीच्या यात्रेवर करोनाचे संकट
सार्वमत

पुणतांब्याच्या आषाढी एकादशीच्या यात्रेवर करोनाचे संकट

साडेतीनशे वर्षाची परंपरा खंडीत होण्याची शक्यता

Arvind Arkhade

पुणतांबा|वार्ताहर|Puntamba

महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र पुणतांबा येथे उद्या गुरुवार दिनांक 16 जुलै 2020 रोजी दरवर्षीप्रमाणे आषाढ महिन्यातील कामिका एकादशीनिमित्त भरणार्‍या यात्रेवर करोनाचे संकट असून करोनामुळे साडेतीनशे वर्षापासून चालू असलेली परंपरा खंडीत होण्याची शक्यता आहे.

योगीराज चांगदेव महाराज यांनी पुणतांबा येथे गोदावरी नदीच्या तिरावर शके 1218 माघ वद्य त्रयोदशीच्या म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी संजीवन समाधी घेतलेली आहे. तेव्हापासून श्रीक्षेत्र पुणतांबा येथे दरवर्षी आषाढ महिन्यातील कामिका एकादशी तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी भव्य यात्रा भरत असते. विशेष म्हणजे कामिका एकादशीच्या दिवशी योगीराज गंगागिरी महाराज नाम सप्ताहाची औपचारिक घोषणा गेल्या 172 वर्षापासून सरला बेटांच्या मठाधिपतीमार्फत किर्तनाद्वारे केली जाते व ज्या गावाने नाम सप्ताहाचे आयोजन केले आहे त्या गावातील ग्रामस्थांना महाराजांच्या हस्ते औपचारिकपणे श्रीफळ दिले जाते.

चालू वर्षी 1 जुलै रोजी असलेली देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी प्रशासनाने चांगदेव महाराजांचे समाधीस्थळ देवस्थानला सांगून दर्शनासाठी बंद ठेवले होते. तसेच पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

कामिका एकादशीच्या दिवशी भरणार्‍या यात्रेत दरवर्षी किमान दोन लाखाच्या वर भाविक हजेरी लावतात. तसेच संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पायी दिंडीने भाविक पुणतांब्याला येत असतात. मात्र करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनामार्फत उद्याची आषाढी यात्रा रद्य करून भाविकांसाठी चांगदेव महाराजांचे मंदिर बंद राहण्याची शक्यता आहे.

तसेच योगीराज गंगागिरी महाराज यांच्या 173 व्या नाम सप्ताहाची घोषणा सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज उद्या पुणतांबा येथे येऊन औपचारिकपणे करणार की सराला बेटामधूनच करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नाम सप्ताहाची घोषणा पुणतांब्यातून करण्याची परंपरा आहे. करोनामुळे ती खंडित होणार की चालू राहणार तसेच महंत रामगिरी महाराज कुठे व कशी घोषणा करणार याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता आहे.

दरम्यान प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन आतापर्यंत योगीराज चांगदेव महाराज देवस्थानामार्फत केले जात आहे. उद्याच्या आषादी एकादशीबाबतही जिल्हाधिकारी, तहसीलदार राहाता, पोलीस निरीक्षक राहाता, ग्रामपंचायत पुणतांबा यांनी दिलेल्या सूचनेचे पालन केले जाणार आहे, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त महेश मुरुदगण यांनी दिली आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com