पुणतांबेकरांनी महावितरणला धरले धारेवर

आधिकार्‍यांसमोर वाचला तक्रारींचा पाढा
पुणतांबेकरांनी महावितरणला धरले धारेवर

पुणतांबा (वार्ताहर)-

पुणतांबा परिसरातील वीज ग्राहकांच्या तक्रारी व सूचना जाणून घेण्यासाठी तसेच वीज बिलाच्या थकित

वसुलीसाठी आयोजित बैठकीत ग्राहकांनी महावितरणच्या आधिकार्‍यांसमोर तक्रारींचा पाढाच वाचला .

ग्रामपंचायतीच्या बैठक दालनात सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी राहाता विभागाचे उपकार्यकारी अभियंता डी. डी. पाटील, सहाय्यक अभियंता डी. डी. राठोड, एन. आर. चव्हाण, शितलकुमार जाधव, उपसरपंच संगिता भोरकडे, जि. प. सदस्य श्याम माळी, जनसेवा मंडळाचे विजय धनवटे, मनसेचे तालुका उपप्रमुख गणेश जाधव, शरद चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, मनोज गुजराथी, डॉ. अविनाश चव्हाण, संदीप धनवटे, भाऊसाहेब केरे, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, योगेश घाटकर यांच्यासह अनेक उपस्थित होते.

वीज ग्राहकांनी विजेचा लपंडाव, कमी दाबाने विद्युत पुरवठा होणे विजेचे वाकलेले पोल, डीपीनादुरुस्त झाल्यास होणारा विलंब, वीज बिले याबाबतच्या तक्रारी व अडचणी मांडल्या.

यावेळी उपकार्यकारी अभियंता श्री. पाटील म्हणाले, अडचणी तातडीने दूर करण्याचा प्रयत्न राहील. शिगवे ते पुणतांबा ही अंदाजे आठ किलोमीटर लांबीची 33 के. व्ही. क्षमतेची स्वतंत्र लाईन टाकली तर पुणतांबेकरांच्या विजेच्या समस्या दूर होतील. तसेच येत्या 4 डिसेंबर रोजी वीज ग्राहकांचा मेळावा आयोजित करून वीज प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली जाईल. तसेच महावितरणचा व्हॉट्स अ‍ॅपवर स्वतंत्र ग्रुप करून वीज ग्राहकांना आपल्या समस्या मांडता येईल याचा आवर्जून उल्लेख केला. महावितरणचे या परिसरात 11 सेक्शन आहेत. तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठ्यात होणारा व्यत्यय दूर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणतांबा उपकेंद्रात नुकतेच नियुक्त झालेले शितल कुमार जाधव यांनी ग्राहकांनी विज बिल भरावे, बिल भरण्यासाठी हप्त्यांची सोय दिली जाईल, असे स्पष्ट केले. मात्र मनसेचे गणेश जाधव यांनी विज बिलाची सक्ती करू नये तसेच कोणाचेही विजेचे कनेक्शन कट करू नये, असे ठणकावून सांगितले. आभार विजय धनवटे यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com