शेतकर्‍यांना 1 कोटी 4 लाख व्याज परतावा

File Photo
File Photo

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

सन 2020-21 वर्षामध्ये नियमीत पीक कर्जाची वेळेत परतफेड करणार्‍या राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांना राज्य सरकारच्या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून 1 कोटी 4 लाख 60 हजारांचा परतावा मंजूर झाला असून पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर या रकमा जमा होणार असल्याची माहिती राहाता तालुका विकास अधिकारी श्री. गुळवे यांनी दिली.

नियमीत पीक कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना वेळेत व नियमित कर्ज भरावे यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने सरकार तीन लाखांपर्यंतच्या पीक कर्जावरील सहा टक्के व्याज सवलत योजने अंतर्गत शेतकर्‍यांना परत देते. यामध्ये राज्य सरकारचा हिस्सा 3 टक्के व केंद्र सरकारचा 3 टक्के असतो. दोन वर्षांपासून नियमीत व्याजासह पीक कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांचे व्याज परतावे रखडले होते. शतकर्‍यांनी मात्र नैसर्गिक आपत्ती असतानाही पोटाला चिमटा घेऊन आपल्याकडील पीक कर्ज व्याजासह वेळेत भरली होती.

रखडलेले व्याज परतावे मिळावेत, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत होती. केंद्र सरकारचे परतावे यापुर्वीच जमा झाले आहेत तर राज्य शासनाकडून राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांना सन 2020-21 या वर्षामधील पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत नियमीत व वेळेवर पीक कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 1 कोटी 4 लाख 60 हजारांच्या व्याज परताव्याची रक्कम देण्यात आली आहे.

यामध्ये जिल्हा बँकेच्या सावळीविहीर शाखे अंतर्गत सेवा सोसायटी सभासदांना 3 लाख 98 हजार 44 रुपये, शिर्डी 10 लाख 6 हजार 408, राहाता 1 लाख 99 हजार 408, कोन्हाळे 81 हजार 374, साकुरी 9 लाख 70 हजार 724, अस्तगाव 4 लाख 86 हजार 267, गणेशनगर 3 लाख 46 हजार 645, वाकडी 4 लाख 58 हजार 472, पुणतांबा 3 लाख 10 हजार 455, पिंपरी निर्मळ 4 लाख 80 हजार 441, बाभळेश्वर 11 लाख 39 हजार 774, कोल्हार 9 लाख 75 हजार 213, प्रवरानगर 3 लाख 12 हजार 302, लोणी बु. 6 लाख 99 हजार 750, लोणी खुर्द 16 लाख 9 हजार 25, पाथरे बु. 3 लाख 45 हजार 49 तर दाढ बु. शाखे अंतर्गत येणार्‍या सेवा सोसायटीच्या सभासदांना 6 लाख 42 हजार 172 एवढी रक्कम व्याज परताव्या पोटी मिळणार असून पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर या रकमा जमा होणार असल्याची माहिती राहाता तालुका विकास अधिकारी श्री.गुळवे यांनी दिली आहे.

त्यामुळे नियमीत पीक कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. नियमितत कर्जाची परतफेड करणार्‍या पिंपरी निर्मळ सेवा सोसायटीच्या 323 सभासदांना सन 2020 - 21 या वर्षाच्या पंजाबराव देशमुख व्याज परताव्यापोटी 4 लाख 80 हजार 441 एवढी रक्कम मिळणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com