पुणे विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर निवडणुकीसाठी रविवारी मतदान

37 उमेदवार रिंगणात मात्र निवडणुकीपासून पदवीधर अंधारात
पुणे विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर निवडणुकीसाठी रविवारी मतदान

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधरांच्या अधिसभेच्या (सिनेट) सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी रविवार दि.20 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. एकूण निवडून द्यावयाच्या 10 जागांसाठी सुमारे 37 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र मतदार यादीत कुणाची नावे आहेत, कुणाची नाहीत या संदर्भात विद्यापीठाच्या निवडणूक शाखेकडून तसेच कोणत्याही मतदाराकडून उमेदवारांना अद्यापही माहिती देण्यात न आल्याने मतदार अंधारात आहेत.

श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील नोंदणीकृत पदवीधर शहरातील रावबहादुर नारायणराव बोरावके महाविद्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या दरम्यान मतदान करतील. श्रीरामपूर तालुक्यात सुमारे सहाशे, तर शहरात अवघे 125 पदवीधर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, यानंतर लगेचच नाशिक पदवीधर मतदार संघाचीही निवडणूक होणार आहे. नाशिक पदवीधर मतदार संघासाठी अलीकडेच मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला. त्यात नगर जिल्ह्यात सुमारे 10 हजार पदवीधरांनी आपली नाव नोंदणी केली आहे.

मात्र सिनेटसाठी मतदान करणार्‍या पदवीधरांची संख्या अत्यल्प आहे. सिनेटची नाव नोंदणी करण्यासाठी पुणे विद्यापीठाने कोणतीच जनजागरण मोहीम उघडली नाही. यामुळे हजारो पदवीधर यापासून वंचित राहिले आहेत. यामुळे पदवीधरांनी पुणे विद्यापीठाबाबत नापसंती व्यक्त केली आहे.

या निवडणुकीत एससी मतदार संघात रोहित कुचेकर, राहुल पाखरे, राहुल ससाणे, संदीप शिंदे, शशिकांत तिकोटे, एसटी मतदार संघात देवराम चाटे, हेमंत कडले, गणपत नांगरे, विश्वनाथ पाडवी तसेच एनटी मतदारसंघात अमोल खाडे, अजिंक्य पालकर, निलेश सानप, विजय सोनवणे असून इतर मागासवर्गीय मतदार संघात मयूर भुजबळ, सचिन गोर्डेे, श्रीकृष्ण मुरकुटे, महेंद्र पठारे तर महिला मधून तबस्सुम इनामदार व बागेश्री माथलकर हे नशीब आजमावित आहेत. खुल्या मतदार संघात महेश अग्रे, बाकीराव बसते, नारायण चाके, सुनील दळवी, संतोष ढोरे, प्रसन्नजीत फडवणीस, सुनील गुलदगड, अभिषेक जोशी, मनीषा कामनकर, सोमनाथ लोहार, विवेक मरभाई, संजीत कुमार मेहता,युवराज नरवडे, वाहीद शेख, दादाभाऊ सिनलकर, सागर वैद्य, संजय यादव, आकाश झांबरे यांचा समावेश आहे. राज्यातील महाविकास आघाडी पुरस्कृत सावित्रीबाई फुले प्रगती मंडळ तर भारतीय जनता पक्ष पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच अशी ही लढत होत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर अधीसभा निवडणूक गुपचूप उरकण्यात येत आहे. या यादीत कुणाची नावे आहेत, कुणाची नाहीत या संदर्भात विद्यापीठाच्या निवडणूक शाखेकडून तसेच कोणत्याही मतदाराकडून उमेदवारांना अद्यापही माहिती देण्यात आली नाही. याबाबत बहुसंख्य पदवीधर मतदारांमध्ये पुणे विद्यापीठाच्या या कारभाराबाबत असंतोष आहे. अतिशय सजग अशी ही निवडणूक मानली जाते. यात केवळ सुशिक्षित नोंदणीकृत पदवीधरच मतदार असून तेच या सर्व प्रक्रियेपासून अनभिज्ञ आहेत.

- शफीक बागवान, श्रीरामपूर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com