पुणे-संगमनेर-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी ऑक्टोबरअखेर 100 टक्के भूसंपादनाचे उद्दिष्ट

पुणे-संगमनेर-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी 
ऑक्टोबरअखेर 100 टक्के भूसंपादनाचे उद्दिष्ट

पुणे |प्रतिनिधी| Pune

तीन जिल्ह्याच्या विकासाला चालना देणार्‍या पुणे-संगमनेर-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी 100 कोटींचा निधी प्राप्त झाल्याने येत्या ऑक्टोबरअखेर 100 टक्के भूसंपादनाचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. त्यामुळे आगामी काळात या मार्गाच्या कामास वेग येणार आहे.

पुणे-संगमनेर-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार्‍या 40 टक्के जमिनींचे मूल्यांकन पूर्ण करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशन - एमएसआरडीसी) करण्यात येणार्‍या वर्तुळाकार रस्ता प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार्‍या जमिनींचे 60 टक्के मूल्यांकन नगररचना विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांसाठी स्वेच्छेने जमिनी देणार्‍या शेतकर्‍यांना तातडीने त्यांचा मोबदला मिळू शकणार आहे.

पुणे-संगमनेर- नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पातील 54 पैकी 40 गावांची मोजणी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. हा प्रकल्प पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतून जाणार असून त्यापैकी 50 टक्के जमीन पुणे जिल्ह्यातील संपादित करण्यात येणार आहे. उर्वरित 50 टक्के जमीन नगर आणि नाशिक जिल्ह्यातील आहे. या प्रकल्पात स्वेच्छेने जमीन देणार्‍यांचे खरेदीखतही करण्यास सुरूवात झाली आहे.

Related Stories

No stories found.