पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वेसाठी थेट खरेदी करण्याचा मार्ग मोकळा

पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वेसाठी थेट खरेदी करण्याचा मार्ग मोकळा

पुणे |प्रतिनिधी| Pune

पुणे-संगमनेर-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी पुणे जिल्ह्यातील आवश्यक असणार्‍या जागा थेट खरेदीने संपादित करण्याच्या पुणे जिल्हाधिकार्‍यांच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिल्याने आता जागा थेट खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, भूसंपादनासाठी आवश्यक 80 टक्के जागेची मोजणी पूर्ण झाली असून रेल्वे प्रशासनाकडून निधी मिळाल्यानंतर भूसंपादनाला सुरुवात करण्यात येणार आहे.

या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर उपविभागीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकार्‍यांनी आवश्यक जमीन मोजणी केली असून शोध अहवालही तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत दोन मार्ग तयार करण्यात येणार असून पुणे-नाशिक अंतर दोन तासांवर येणार आहे. प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेऊन थेट खरेदीने भूसंपादन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला होता. भूसंपादनासाठी आवश्यक 1200 ते 1500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

पुणे-संगमनेर- नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गासाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील 1470 हेक्टर जमिनीपैकी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांमधील 575 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. ही प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही प्राप्त झाले असून त्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे. प्रत्यक्ष भूसंपादन करण्यापूर्वी संपादित करण्यात येणार्‍या पुणे जिल्ह्यातील जागेचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. संपादनासाठी भूसंपादन अधिकारी देखील नियुक्त करण्यात आले आहेत. हे भूसंपादन सुरू करण्यापूर्वीची औपचारिकता प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.

थेट खरेदीने जागा संपादित करण्याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने लवकरच संबंधित गावातील जमिनी शासकीय दरानुसार विकत घेण्यात येतील. तसेच बहुतांशी गावांतील जमीन मोजणीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जागेचे दर निश्चितीचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वेचा वेग प्रतितास 200 कि.मी. इतका असणार आहे. या मार्गावर 18 बोगदे, 41 उड्डाण पूल आणि 128 भुयारी मार्ग असणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com