पुणे-संगमनेर-नाशिक भूसंपादन, सरकारी वन जमिनीचे हस्तांतरण मार्गी लावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात गेली अडीच वर्षे रखडलेल्या अहमदाबाद -मुंबई बुलेट ट्रेनच्या कामाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, बुलेट ट्रेनशी संबंधित भूसंपादन, मोबदला, जागा हस्तांतरण हे विषय येत्या महिनाभरात म्हणजे 30 सप्टेंबर पूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. पुणे-संगमनेर-नाशिक सेमी हायस्पिड रेल्वे मार्गाला निती आयोगाने मान्यता दिली असून केंद्राच्या अर्थविषयक व्यवहार मंत्रिमंडळ समितीची मान्यता बाकी आहे. या प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन, शासकीय आणि वन जमिनीचे हस्तांतरण या बाबींना गती देण्याची सूचनाही त्यांनी केली.

राज्यातील रेल्वे, मेट्रो, मल्टीमोडल कॉरिडॉर, तुळजापूर, पंढरपूर अशा काही पायाभूत सुविधा प्रकल्पांचा एकनाथ शिंदे यांनी काल आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर संबंधित विभागांनी काम करावे तसेच प्रलंबित बाबी, आवश्यक परवानग्या या तातडीने मिळवून घ्याव्यात.प्रकल्प रेंगाळल्यास त्याचा खर्चही वाढतो, त्याचप्रमाणे लोकांना सुविधा देखील मिळण्यास उशीर होतो.

केंद्र सरकार विविध प्रकल्पांना मान्यता देत असून राज्याने देखील याचा फायदा करून घेतला पाहिजे आणि पाठपुरावा करून योजना मार्गी लावल्या पाहिजेत यावर मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत भर दिला.

समृध्दी महामार्गावरून धावणार बुलेट ट्रेन

आजच्या बैठकीमध्ये बुलेट ट्रेन व्यतिरिक्त मुंबई मेट्रो मार्ग-3 , 4 ,5 ,6 ,9 आणि 11 तसेच मेट्रो मार्ग 2 ए (दहिसर पूर्व ते डीएन नगर), मेट्रो मार्ग-7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व), यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो मार्ग-4 तसेच ठाणे ते कल्याण व्हाया भिवंडी हा मेट्रो मार्ग-5 या मार्गांसाठी भूसंपादन तसेच हस्तांतरणाचे काम वेगाने पूर्ण करावे, अशी सूचना शिंदे यांनी दिली.

या बैठकीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मध्य रेल्वे, हाय स्पीड रेल कार्पोरेशनचे अधिकारी तसेच एमएमआरडीए आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते. पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीच्या सद्यस्थितीचे सादरीकरण वॉर रूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com