पुणे-नाशिक मार्गावर दुसर्‍यांदा टोलवाढ

चाळकवाडी टोलनाक्यावर 25 रुपयांनी वाढ
पुणे-नाशिक मार्गावर दुसर्‍यांदा टोलवाढ

घारगाव |वार्ताहर| Ghargav

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चाळकवाडी आणि हिवरगाव टोल नाक्यांवर आकारण्यात येणार्‍या टोलमध्ये 2022 या वर्षात दुसर्‍यांदा वाढ करण्यात आली आहे. चाळकवाडी टोलकानाक्यावर हलक्या वाहनांसाठी तब्बल 25 रुपयांनी वाढ केली असून, सोमवारी (दि.06) मध्यरात्री पासून ही दरवाढ लागू झाली आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर दोन वर्षांनी टोलवाढ करण्यात येते. चाळकवाडी टोलनाका 2017 मध्ये बंद पाडण्यात आला होता. तो गेल्या आर्थिक वर्षांत पुन्हा सुरू करण्यात आला. त्यानंतर एप्रिल महिन्यात चाळकवाडी आणि हिवरगाव येथील टोलनाक्यांवर आकारण्यात येणार्‍या टोलमध्ये एक एप्रिल 2022 रोजी पाच रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानुसार कार आणि हलक्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी 50 रुपये आणि दुहेरी प्रवासासाठी 80 रुपये टोल आकारला जात होता.

आता दोन महिन्यांनंतरच पुन्हा चाळकवाडी टोलनाक्यावरील टोल 25 रुपयांनी वाढविला आहे. त्यानुसार आता कार व हलक्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी 75 आणि दुहेरी प्रवासासाठी 110 रुपये टोल आकारण्यात येणार आहे. हलकी व्यावसायिक वाहने, मिनी बससाठी एकेरीचा टोल 115 आणि दुहेरी प्रवासासाठी 175 रुपये करण्यात आला आहे. तर, दोन एक्सल ट्रक व बसचा एकेरी वाहतुकीचा टोल 245 आणि दुहेरी प्रवासासाठी 370 रुपये राहणार आहे.

तीन एक्सल मालवाहतूक वाहनांना एकेरी वाहतुकीचा टोल 270 आणि दुहेरी प्रवासासाठी 405 रुपये, चार ते सहा एक्सल मालवाहतूक वाहनांना एकेरी वाहतुकीचा टोल 385 आणि दुहेरी प्रवासासाठी 580 रुपये, सात व त्यापेक्षा अधिकच्या एक्सल मालवाहतूक वाहनांना एकेरी वाहतुकीचा टोल 470 आणि दुहेरी प्रवासासाठी 705 रुपये राहणार आहे.

हिवरगाव पावसा टोलनाक्यावर कार आणि हलक्या खासगी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी 90 रुपये टोल होता. तो आता 100 रुपये करण्यात आला आहे. दुहेरी प्रवासाठी 140 रुपये टोल द्यावा लागणार आहे. हलकी व्यावसायिक वाहने, मिनी बससाठी 165 रुपये, बस आणि ट्रकसाठी 345 रुपये टोल द्यावा लागेल. ही टोलवाढ सोमवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

टोल दरवाढीचे फलक प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी फाडले

पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी आणि हिवरगाव टोल नाक्यांवरील वसुलीचा ठेका नवीन कंपनीने घेतला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून नवीन दर लागून होणार आहे. मात्र त्यापूर्वी टोलनाक्यावर अधिकच्या दराचे फलक लावण्याचे काम चालू होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी सोमवारी टोलनाक्याला भेट दिली असता त्यांनी अधिकच्या दराचे फलक फाडून टाकले. रात्री बारानंतर अधिकच्या दराचे फलक लावण्याच्या सूचना केल्या.

चाळकवाडी टोलनाक्यावर दोन महिन्यात 30 रुपयाने टोल वाढला आहे. एकीकडे महागाई वाढत आहे. डिझेल, पेट्रोलचे दर वाढते आहे. त्यात पुन्हा टोल वाढला. सामान्य माणसाचा विचार करून सरकारने टोलवाढ मागे घ्यावी.

- बाळासाहेब कुर्‍हाडे, प्रवाशी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com