पुणे जिल्ह्यातील जुगार चालकांनी बोटा परिसरात थाटले जुगार अड्डे

पुणे जिल्ह्यातील जुगार चालकांनी बोटा परिसरात थाटले जुगार अड्डे
File Photo

घारगाव |वार्ताहर| Ghargav

पुणे ग्रामीण पोलिसांच्या कारवाईचा जोर पाहून पुणे जिल्ह्यातील जुगार अड्डा चालकांनी पुणे-अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दी नजीकच्या संगमनेर तालुक्याच्या बोटा परिसरात स्थानिकांना व्यावसायिक भागेदार करत जुगाराचे अड्डे थाटले आहे. आठवड्यातून दोन दिवस मांसाहरी जेवणासह जुगार खेळण्यास व्याजी तत्त्वावर पैसेही दिले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जुन्नर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा येथील सर्वच जुगार अड्डे चालकांनी पोलीस कारवाईच्या भीतीने अड्डे बंद करून संगमनेर तालुक्याच्या बोटा परिसरात मोठमोठे फड सुरु केले आहे. बिनधास्त या आणि खेळा या धर्तीवर स्थानिक पोलिसांचा आशीर्वादाने जुगार अड्डे सुरु आहे. संगमनेर उपविभागाच्या प्रमुखासह ठाणेदाराला सेट केल्यानंतर संगमनेर उपविभागातील जुगार अड्ड्यावर छापे पडत नाहीत, अशी चर्चा पुणे जिल्ह्यातील जुगार अड्डे चालकांकडून समोर आली आहे. बोटा परिसरात मागील दोन वर्षापासून शेतात थाटलेल्या जुगार अडड्याच्या तक्रारी आल्यास कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. पोलीस आणि जुगार अड्डे चालकांचे साटेलोटे असल्यानेच असे अवैध धंदे सर्रासपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे.

जुगार खेळण्यास येणार्‍यांची याठिकाणी चांगली बडदास्त ठेवली जाते. खेळण्याच्या ठिकाणी वेळेत हवे ते जेवण पोचविले जाते. तर रविवार आणि इतर एक दिवशी याठिकाणी मांसाहारी जेवणही ठेवले जाते. त्यामुळे अनेकांना हा अड्डा घरचा अड्डाच ठरला आहे. मांसाहारी जेवणाच्या दिवशी खेळणार्‍यांचीही मोठी गर्दी होते. या अड्यावर दिवसाकाठी लाखोची माया जमा केली जात आहे. नियमीत खेळण्यास येणार्‍यांनाच याठिकाणी परवानगी दिली जाते.

इतर नवख्या माणसाला नियमित खेळणार्‍याच्या ओळखीवर प्रवेश दिला जातो. खेळताना एखादा पैसा हरल्यास त्यास पुन्हा खेळण्यासाठी प्रवृत्त करीत याठिकाणी पैसेही दिले जात आहेत. मासिक 10 टक्के व्याजदराने सावकारी कर्ज दिले जात आहे. त्यामुळे सध्या अनेक जुगारी सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकत आहेत. हे कर्ज फेडण्यासाठी आणखी जुगाराच्या नादी लागत आहेत. अनेक कुटुंबे यामुळे रस्त्यावर येऊ लागली आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वता लक्ष घालून बोटा परिसरातील अडड्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.