पुनतगाव बंधार्‍याची गळती थांबणार

आ. गडाख यांच्या पाठपुराव्याने नवीन 218 फळ्या मंजूर
पुनतगाव बंधार्‍याची गळती थांबणार

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात असलेल्या प्रवरा नदीवरील नेवासा तालुक्यातील पुनतगाव बंधार्‍याच्या 218 फळ्या टप्याटप्याने बदलण्यात याव्यात, असा अहवाल संबंधित विभागामार्फत वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. आ. शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्यामुळे या फळ्या मंजूर झाल्याने या बंधार्‍याची गळती थांबवून भविष्यातील पाणी टंचाईचा प्रश्न निकाली लागणार आहे.

नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव व मधमेश्वर (नेवासा) हे तीन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असून बंधार्‍याच्या पाण्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतीला मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. अनेक गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागते. यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे तिनही बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पुनतगाव बंधार्‍याची पाणी साठवण क्षमता 89 दशलक्ष घनफुट एवढी असून सन 2010 ते 2011 मध्ये बंधार्‍याच्या फळ्या बदलण्यात आल्या होत्या. यातील अनेक फळ्या नादुरुस्त झाल्याने पाण्याच्या गळतीचे प्रमाण वाढून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवू नये म्हणून पुनतगाव बंधारा लाभक्षेत्रातील लाभधारक शेतकर्‍यांनी ही बाब आ. शंकरराव गडाख यांच्या निदर्शनास आणून देत तातडीने नवीन फळ्या बसवून पाणी गळती रोखण्याची मागणी केली होती.

आ. गडाख यांनी वेळोवेळी नाशिक पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करून बंधार्‍याच्या फळ्या तातडीने बसविण्यासाठी प्रयत्न केले. यानुसार संबधीत विभागामार्फत आ. गडाख यांच्या सूचनेनुसार पुनतगाव बंधार्‍याचे सर्वेक्षण करण्यात आले. बंधार्‍यावरील एकूण 434 फळ्या पैकी नवीन 218 फळ्या तातडीने बसविण्याची आवश्यकता असून 216 फळ्या टप्याटप्याने बदलण्यात याव्यात, असा अहवाल संबंधित विभागामार्फत वरिष्ठांकडे पाठविण्यात आला, आ. गडाख यांनी पाठपुरावा केल्यामुळे 218 फळ्या तातडीने बदलविण्यासाठी प्रत्यक्ष साईटवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकीकरण विभागामार्फत सांगण्यात आले.

पुनतगाव बंधार्‍याच्या फळ्या तातडीने बदलविण्यात आल्या येणार असल्याने पुनतगाव बंधार्‍याच्या पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर रोखली जाणार आहे. यामुळे पुनतगाव, पाचेगाव, गोणेगाव, निंभारी, खुपटी, चिंचबन या गावांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही पिकांना पाणी उपलब्ध होऊन शेती व पिके बहरणार आहेत.

आ. शंकरराव गडाख यांनी विशेष प्रयत्न करून पुनतगाव बंधार्‍यासाठी नवीन फळ्या मंजूर केल्यामुळे सदरचे काम तातडीने सुरू होणार आहे. त्यामुळे गळती थांबून पाणी बचत होईल, तसेच शेतकर्‍यांना भविष्यात भर उन्हाळ्यात पिकांना पाणी मिळेल. त्यामुळे बंधार्‍यावरील लाभार्थी शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त करून आ. गडाख यांचे आभार मानले आहेत.

- सुधाकर पवार, लाभधारक, पुनतगाव.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com