अकोले सार्वजनिक बांधकाम व नगरपंचायतच्या वादात नागरिक वेठीस

अकोले सार्वजनिक बांधकाम व नगरपंचायतच्या वादात नागरिक वेठीस
Sarvmat_Update

अकोले (प्रतिनिधी)

-सार्वजनिक बांधकाम विभाग व अकोले नगर पंचायत या दोघांच्या वादात अकोले, महालक्ष्मी मंदिर, परखतपूर या रस्त्याचे काम यावर्षीही सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा महालक्ष्मी कॉलनी, राधानगरी कॉलनी, पानसरवाडी, परखतपूर या परिसरातील शेकडो नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

अकोले शहरातील अगस्ति कारखाना रस्त्यावरून महालक्ष्मी मंदिर, परखतपूर, पानसरवाडी कडे जाणारा हा रस्ता अकोले नगर पंचायत हद्दीत येत आहे. दरवर्षी महालक्ष्मी मंदिर येथे नवरात्रीच्या काळात याच रस्त्यावरून हजारो भाविक दर्शनासाठी ये -जा करत असतात. त्यात रस्ता अरुंद असल्याने व पक्क्या साईड गटारी नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात या भागातील लोकांना ये-जा करतांना मोठ्या यातना सहन कराव्या लागतात. या रस्त्याला गटार नसल्यामुळे पावसाळ्यात सर्व पाणी थेट रस्त्या वरूनच वाहत असते. या रस्त्यावरील रहिवाशांचे सांडपाणी देखील या रस्त्यावर वाहत असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण होत असते. परिणामी या भागात डासांचे साम्राज्य तयार होत असते. त्यामुळे महालक्ष्मी कॉलनी परिसर, राधानगरी कॉलनी, खंडोबा माळ, पानसरवाडी या परिसरातील नागरिकांचे आरोग्य नेहमीच धोक्यात येत असते.

अकोले शहरातून जाणार्‍या परखतपुर- वाशेरे रस्त्याची पाऊस सुरू झाल्यावर बिकट अवस्था निर्माण होते. विशेष म्हणजे खंडोबा माळ ते कारखाना रस्त्यावरील महालक्ष्मी क्लॉथ पर्यंत पावसाळ्यात खूप पाणी असते. महालक्ष्मी मंगल कार्यालय याच्यापुढे तर या रस्त्याला नदीचे स्वरूप आलेले असते. याच रस्त्यावर महालक्ष्मी मंदिर आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी देखील पावसाळ्यात रस्ता राहत नाही. रस्त्याला पाणी असल्याने महालक्ष्मी कॉलनी पानसरवाडी, परखतपूर व वाशेरे या भागातील शाळेतील विद्यार्थी तसेच नागरिकांची अकोले शहरात येताना खूप हाल होत असते. शहराला जोडला जाणारा हा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. सध्या हा रस्ता जिल्हा परिषदेकडे आहे असे सांगण्यात येते.

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या बद्दल काही सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी तक्रार केली होती. जिल्हा परिषदेने हा रस्ता अकोले नगरपंचायत हद्दीमध्ये येत असल्याने आम्ही काहीही करू शकत नाही, असे सांगून टोलवाटोलवी केली. तर अकोले नगरपंचायतच्या म्हणण्यानुसार हा रस्ता जिल्हा परिषदेकडे आहे. या दोन विभागांच्या भांडणात या रस्त्याला कुणी वाली आहे का? असा संतप्त सवाल नागरिक आता विचारू लागले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची अवस्था अशीच आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी आ. डॉ. किरण लहामटे यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com