पीएसआय माळी यांच्या पदरी ‘रिवार्ड’ ऐवजी निलंबनाची कारवाई !

पीएसआय माळी यांच्या पदरी ‘रिवार्ड’ ऐवजी निलंबनाची कारवाई !

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

गुजराथ मधील व्यापार्‍याचे लाखो रुपयांचे तेलाचे डबे चोरीला गेले होते. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी (Sub-Inspector of Police Rohidas Mali) यांनी अवघ्या तीन दिवसात लावला. याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखांकडून त्यांना ‘रिवार्ड’ (Reward) मिळणार होते. मात्र स्थानिक अधिकार्‍यांकडून वरिष्ठ अधिकार्‍यांना गेलेल्या अहवालामुळे श्री. माळी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने जिल्हा पोलीस प्रमुखांच्या (SP Action) या कारवाईचा पोलीस वर्तुळातूनच निषेध (Protest from police circle) व्यक्त होत आहे.

पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे संगमनेर शहर पोलिस ठाण्यात (Sangmner City Police Station) गेल्या दोन वर्षापासून कार्यरत आहे. या कालावधीत ते कधीही वादग्रस्त ठरलेले नाहीत. जिल्हा पोलीस प्रमुखांनी ‘मुस्कान’ मोहिम राबविली. या मुस्कान मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी उत्तम कामगिरी (Great performance) केली. 50 बेपत्ता झालेल्या महिला बालके व पुरुषांचा शोध त्यांनी लावला. गुजराथ येथील व्यापार्‍याचे तेल डब्यांची चोरीचे प्रकरण त्यांनी तडीस नेले. मुद्देमालासह आरोपी ताब्यात घेतले. अवघ्या तीन दिवसात केलेली त्यांनी ही कामगिरी त्यांना ’रिवार्ड’ देणारी ठरली होती.

याशिवाय अनेक गुन्ह्यांचा तपासही लावलेला असतानाही केवळ कर्तव्यात कसूर केल्याचे कारण दाखवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक माळी यांना करोनाची बाधा झाल्यानंतर ते उपचारासाठी रजेवर गेले होते. समजलेल्या माहितीनुसार त्यांनी कोणतीही चुकीची नोंद पोलिस ठाण्यात केलेली नाही. स्थानिक अधिकार्‍यांनी केवळ आकसापोटी त्यांच्याबाबतचा अहवाल पाठविला. आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होत आहे.

संगमनेर शहर पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकार्‍याची कारकीर्द वादग्रस्त ठरत आहे. ती सर्वश्रृत आहे. अधिकार्‍याच्या भूमिकेमुळे संगमनेर शहर पोलीस ठाणे वादग्रस्त बनत असल्याचे चित्र सध्या आहे. पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई अयोग्य असल्याची प्रतिक्रिया पोलिस दलातील अनेक जण खाजगीत बोलताना व्यक्त करत आहे. त्यांच्यावरील ही कारवाई मागे घ्यावी, अशी मागणीही होऊ लागली आहे.

मिळणार होते रिवार्ड..

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी चोरी प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसात तपास केला होता. तेल चोरी प्रकरणात त्यांनी, 330 फॉर्च्यून तेलाचे डबे, दीड लाख रुपयांची रोकड असा एकूण 9 लाख 82 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात यश मिळवले होते. या यशस्वी तपासाबद्दल त्यांना पोलीस अधीक्षकांच्या उपस्थित ‘रिवार्ड’ मिळणार होते. मात्र निलंबनाची कारवाई झाल्याने ‘रिवार्ड’ ऐवजी त्यांना निलंबनाचे दुःख मिळाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com