अहमदनगर (प्रतिनिधी) -

महावितरणच्या तेलीखुंट कार्यालयाचे सहायक अभियंता व कर्मचार्यांना झालेली मारहाण ही निंदनीय आहे. या घटनेमुळे अभियंते व कर्मचार्यांनी खचून

जाऊ नये, प्रशासन पाठीशी आहे, या शब्दांत कर्मचारी आणि अधिकार्यांना धीर देत, थकीत वीज बिल वसूलीसाठी पोलीस संरक्षण देण्याचे संकेत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी नगरमध्ये दिले.

शुक्रवारी रात्री तेलीखुंट कार्यालयात निखिल धंगेकर याने सहायक अभियंता राजेंद्र पालवे, कर्मचारी अमोल शेळके, बापू बडेकर यांना मारहाण केली. आरोपीविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तत्परतेने आरोपीस अटक केली आहे. या दुर्दैवी घटनेची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी रविवारी तेलीखुंट कार्यालयाला भेट दिली. झालेल्या प्रकाराची संपूर्ण चौकशी करीत या घटनेची विस्तृत माहिती घेतली. तसेच पोलीस प्रशासनाला कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

कर्मचार्यांशी हुज्जत घालून मारहाणीसारखे प्रकार करणार्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे. महावितरण प्रशासन आपल्या कर्मचार्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून महावितरण कर्मचार्यांना कायम संरक्षण देण्यासाठी विचार करण्यात येईल. महावितरणची वसुली मोहीम सुरू होत आहे.

या काळात कर्मचार्यांना मारहाण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात येतील. त्यासाठी लवकरच पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. यावेळी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एच. एल. भराडे, सहाय्यक अभियंता किरण महाजन, राजेंद्र पालवे, गायकवाड, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार तांत्रिक संघटनेचे अध्यक्ष सतीश भुजबळ, शंकर जारकड, विक्रम कोके, शिवा चितळकर, प्रविण जठार, किशोर काळे, अशोक आव्हाड, संदीप जाधव, शरद सोनवणे, अन्सार शेख, पांडुरंग पिसे, कुशल पडोळे आदी उपस्थित होते.