शेतकर्‍यांना शेततळे योजनेचे अनुदान द्या

आमदार काळेंचे कृषिमंत्री भुसेंना निवेदन
शेतकर्‍यांना शेततळे योजनेचे अनुदान द्या

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकर्‍यांचे कृषी विभागाअंतर्गत असलेल्या शेततळे योजनेचे अनुदान रखडले असून हे अनुदान तातडीने शेतकर्‍यांना मिळावे, अशा आशयाचे निवेदन आ. आशुतोष काळे यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना दिले आहे.

शेतकर्‍यांना वेळेवर पिकांना पाणी देता यावे यासाठी शासनाकडून मागेल त्याला शेततळे योजना राबविली जात आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक शेतकर्‍यांनी या योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे. बहुतांशी शेतकर्‍यांना या योजनेचे अनुदान मिळालेले आहे. मात्र 2019-20 या वर्षातील 69 लाभार्थी आजही शेततळ्याच्या अनुदानापासून वंचित आहेत. ही अनुदानाची एकूण रक्कम रुपये 33 लाख 76 हजार एवढी आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांपुढे काहीशा आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शेतकर्‍यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे आजपर्यंत आलेल्या नैसर्गिक संकटाच्या वेळी झालेल्या नुकसानीची बहुतांश भरपाई दिली आहे. मात्र 2019-20 या वर्षात वैश्विक करोना महामारीमुळे अर्थव्यवस्था अडचणीत आल्यामुळे शेततळ्याचे अनुदान रखडले आहे. परंतु आता परिस्थिती सुधारत असून अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. शेतकर्‍यांना रब्बी हंगामाची तयारी करताना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.

त्यामुळे एकूण परिस्थितीचा विचार करून शेततळे योजनेचे रखडलेले अनुदान तातडीने शेतकर्‍यांना मिळावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. सदर मागणीला कृषीमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर शेततळे योजनेचे रखडलेले अनुदान शेतकर्‍यांना देणार असल्याची ग्वाही दिली आहे अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com