प्रांताधिकार्‍यांना झालेल्या धक्काबुक्कीचा नगरमध्ये निषेध

प्रांताधिकार्‍यांना झालेल्या धक्काबुक्कीचा नगरमध्ये निषेध

कर्जत | प्रतिनिधी

कर्जतचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना वाळूतस्कर पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना आज निवेदन दिले.

कर्जतचे उपविभागीय अधिकारी यांनी पायी चालत जावून वाहनाचा चालक व तेथे उभा असणारा इसम यांना वाळू वाहतुकीच्या परवानाबाबत विचारणा केली. त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे तेथे उभा असलेल्या निळ्या पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातलेल्या इसमाने सांगितले. या इसमाने वाहन सोडवण्याची उपविभागीय अधिकारी यांच्याकडे विनंती केली. त्यावर वाळूचा ट्रक प्रांत कार्यालयाकडे घेण्यास सांगितले.

वाळू तस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याने प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या शर्टच्या कॉलरला तसेच मानेला व डोक्याला पकडून बाजूला ढकलून दिले व धक्काबुक्की करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच वाळूचा ट्रक पळवून नेऊन शासकीय कामात अडथळा आणला.

या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी स्वतः प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले आणि कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे उपस्थित असताना गुन्हा नोंदविण्यासाठी तब्बल सहा तास विलंब लावण्यात आला. महसूल विभागातील अधिकारी हे कारवाई करत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग आणि त्याने केलेले बेकायदेशीर कृत्य व प्रांताधिकार्‍यांशी केलेले दुर्वर्तन या घटनेचा अहमदनगर जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून निवेदनाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

शासकीय सेवक व अवैध गौण खनिज प्रतिबंधाची जबाबदारी असूनसुद्धा अवैध वाळू तस्करीत सहभागी असणाऱ्या पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याच्यावर शासकीय सेवेतून बडतर्फीची कारवाई करावी व दाखल केलेल्या एफआयआरमध्ये शासकीय कामात अडथळा आणण्याबाबत कलम ३५३ दाखल करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनावर संदीप निचित, उदय किसवे, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे, कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, जामखेडचे तहसीलदार डॉ. योगेश चंद्रे, श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील, अकोलेचे तहसीलदार सतीश थेटे, संगमनेरचे तहसीलदार अमोल निरुम, कर्जतचे निवासी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, कर्जतचे एम. एन. आय. प्रकाश बुरुंगळे, जामखेडचे नायब तहसीलदार मनोज भोसेकर, नगरचे तहसीलदार उमेश पाटील आदींच्या सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com