काळ्या फिती लावून महसूल कर्मचार्‍यांचे काम

केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा केला निषेध
काळ्या फिती लावून महसूल कर्मचार्‍यांचे काम

अहमदनगर (प्रतिनिधी) - केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना नगर जिल्हा शाखेच्या वतीने काळ्या फिती लावून राष्ट्रीय विरोध दिन पाळण्यात आला.

जिल्ह्यातील सरकारी कार्यालयातील कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून राष्ट्रीय विरोध दिनात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालया समोर संघटनेच्या वतीने कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करून विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अर्जुन श्रीनिवास यांना देण्यात आले.

यावेळी सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष सुभाष तळेकर, खजिनदार श्रीकांत शिर्शिकर, उपाध्यक्ष विलास पेद्राम, पी.डी. कोळपकर, बाळासाहेब वैद्य, सुधाकर साखरे, कैलास साळुंके, विजय काकडे आदी उपस्थित होते. राज्य सरकारी कर्मचारी महासंघ देशातील 29 राज्यातील 80 लाख राज्य सरकारी कर्मचार्यांचे नेतृत्व करीत असून केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात 15 जुलै रोजी राष्ट्रीय विरोध दिन पाळण्यात आला आहे.

करोना महामारीच्या दोन लाटा आल्या. या महामारीच्या संकटाचे निराकारण धैर्याने करण्याचे शौर्य प्रत्येक राज्यातील आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांनी केले आहे. अशा कर्तव्यनिष्ठ कामगार कर्मचार्‍यांच्या हक्काचा संकोच करणारे कायदे सध्या देशात मंजूर केले जात आहेत.

सरकारी क्षेत्रातील आस्थापनांचे अविवेकी खाजगीकरण केले जात आहे. तसेच कर्मचारी संख्याबळाचा अविचारी संकोच केला जात आहे. प्रत्येक राज्यातील लाखो कर्मचारी रिक्त पदे भरली जात नाहीत. सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्यातच कर्मचार्यांचे हित आहे.

राज्य सरकारी कर्मचार्यांना देय असलेले अनुज्ञेय आर्थिक लाभ रोखले जात असून, कोरोना संक्रमणामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचार्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी व अनुज्ञेय आर्थिक लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरु आहे. या मागणीकडे केंद्र सरकारने सकारात्मकतेने लक्ष दिल्यास कर्मचार्यांना न्याय मिळणार असल्याचे संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com