'त्या' कुंटणखान्यातून ताब्यात घेतलेली तरुणी वसतिगृहातून गायब

'त्या' कुंटणखान्यातून ताब्यात घेतलेली तरुणी वसतिगृहातून गायब

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील वडगावपान परिसरातील बेकायदेशीर कुंटणखान्यातून सुटका केलेली व नंतर शहरातील प्रियदर्शनी संस्थेच्या वसतिगृहात ठेवण्यात आलेली पीडित तरुणी काल या वसतिगृहातून अचानक गायब झाली आहे. यामुळे वसतिगृह चालक व पोलीस यांची चांगलीच पळापळ झाली आहे.

श्रीरामपूर येथील पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने वडगावपान येथील एका लॉजवर छापा टाकून या तरुणीची सुटका केली होती. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायदा कलम 3, 4, 5, 7, 8 नुसार दाखल गुन्ह्यातील बदलापूर येथे राहणारी 22 वर्षीय तरुणी तात्पुरत्या आश्रयासाठी संगमनेर तालुका पोलिसांनी संगमनेर शहरातील गोल्डन सिटी मधील प्रियदर्शनी आदिवासी सेवाभावी संस्थेच्या वसतिगृहामध्ये ठेवली होती.

संस्थेच्या इमारतीतील रुम नं.1 मधील तिची व्यवस्था करण्यात आली होती. या खोलीमध्ये संस्थेच्या स्वयंपाकी माया जाधव उपस्थित होत्या. काल सकाळी साडेसहा वाजता सुमारास जाधव ह्या स्वयंपाक करण्यासाठी रुममध्ये गेल्या असताना सदर पीडित तरुणी तिची सॅक तेथेच ठेवून निघून गेली आहे. सदर तरुणी संस्थेच्या खोलीमधून गायब झाल्याचे लक्षात येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. गायब झालेल्या तरुणीने तिची रोख रक्कम 400, मनगटी घड्याळ व मेकअपचे साहित्य, मोबाईलचे चार्जर असलेली सँक रुमध्येच ठेवलेली होती.

याबाबत प्रियदर्शनी ग्रामीण व आदिवासी सेवाभावी संस्थेच्या अधिक्षिका योगिता सतिश साळुंखे यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. पीडित वसतिगृहातून गायब झाल्याचे वृत्त समजताच पोलिसांची चांगलीच पळापळ झाली आहे. गायब झालेल्या तरुणीचा लवकरच शोध घेण्यात येईल, असे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी सांगितले.दरम्यान सदर पीडित तरुणी ही गायब झाली की, तिला गायब करण्यात आले याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com