संगमनेरातील ‘त्या’ मालमत्ताधारकाला नगरपरिषदेची नोटीस

वाढीव बांधकाम न काढल्यास कायदेशिर कारवाई
संगमनेरातील ‘त्या’ मालमत्ताधारकाला नगरपरिषदेची नोटीस

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर नगरपरिषदेने दिलेल्या बांधकाम परवान्यापेक्षा जादा बांधकाम करणार्‍या शहरातील नवीन नगर रोडवरील एका मालमत्ता धारकाला परिषदेच्या बांधकाम विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. वाढीव बांधकाम तातडीने काढण्यात यावे, अन्यथा नगरपरिषद कायदेशिर कारवाई करणार असल्याचे परिषदेने बजावलेल्या नोटीसीत म्हटले आहे.

संगमनेरातील नवीन नगर रोडवर गट सर्व्हे नंबर 149/2 मध्ये प्रभप्रीत कौर दिलीपसिंह पंजाबी यांच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. नगरपरिषदेकडून त्यांनी 30 मार्च 2021 रोजी बांधकाम परवाना घेतलेला आहे. मात्र सदर बांधकाम परवान्यापेक्षा त्यांनी वाढीव बांधकाम केले आहे. याबाबत दर्गाह पीर हजरत फखरुल्लाह बारामासी दर्गाहचे मुख्य विश्वस्त अब्दुल गफ्फार अब्दुल लतीफ शेख यांनी नगरपरिषदेकडे तक्रार केली होती.

सदर जागेचा जुना गट सर्व्हे नंबर 803 असून नवीन गट सर्व्हे नंबर 149 आहे. सदर एकूण वक्फ क्षेत्र 4 एकर 17 गुंठे आहे. सदर जागेत बेकायदेशिर बांधकामे झालेली असून तर नव्याने काही बांधकामे होत आहे. त्यामध्ये प्रभप्रीत कौर दिलीपसिंह पंजाबी यांनी सुरु केलेले बांधकाम हे वाढीव झाले आहे. याबाबत शेख यांनी नगरपरिषदेकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची नगरपरिषदेकडून दखल घेण्यात येवून प्रभप्रीत कौर दिलीपसिंह पंजाबी यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

नोटीसीत म्हटले आहे की, स. न. 149/2 नवीन नगर रोड या ठिकाणी प्रभप्रीत कौर दिलीपसिंह पंजाबी यांचे बांधकाम सुरु आहे. त्यांनी नगरपरिषदेकडून 30 मार्च 2021 रोजी बांधकाम परवानगी घेतली आहे. मात्र बांधकाम करतांना हे परवानगी नुसार व त्यातील शर्ती व नकाशेनुसार नाही व साईड मार्जिन सोडलेले नाही तरी केलेले वाढीव बांधकाम त्वरीत स्वखर्चाने काढून घ्यावे, अन्यथा तुमचेवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. या नोटीसीमुळे वाढीव बांधकाम करणार्‍या मालमत्ताधारकाकडून काय कार्यवाही केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केवळ 12000 चौ.मी. बांधकाम क्षेत्रासाठी परवानगी दिली असतांना बांधकाम परवानगीचा गैरवापर केला गेला आहे. बांधकाम विभागातील संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांचे दुर्लक्षामुळे, बांधकामाची कोणतीही पाहणी करण्यात आली नाही. नमुद क्षेत्रापेक्षा जास्त सुमारे 40 हजार चौ.मी. बांधकाम करण्यात आले आहे. बांधकाम चालु असलेल्या क्षेत्राचे उत्तर बाजुस महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे नोंदणी असलेले दर्गाह पीर हजरत फखरुल्लाह बारामसी हा दर्गाह असतांना तो दर्गाह मोजणी नकाशामध्ये, बांधकाम परवानगी मिळणेकामी दिलेल्या अर्जामध्ये व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये जाणीवपूर्वक दर्शविलेला दिसत नाही. मुख्याधिकारी यांनी यात लक्ष घालून परवानगीपेक्षा जास्त सुरु असलेले बांधकाम त्वरीत थांबवुन जास्त झालेले बांधकाम निस्कषीत करण्यात यावे अशी मागणी गफ्फार शेख यांनी केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com