
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
श्रीरामपूर शहरातील बोरावके महाविद्यालयात इतिहास विषयाचे प्राध्यापक व नगर येथे निवास असलेले प्रा. शिवाजी किसन ऊर्फ देवा होले यांची गोळ्या झाडून हत्या करणार्या तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. ते तिघेही राहुरी तालुक्यातील असून सराईत गुन्हेगार आहेत.
दरम्यान, त्यांनी संगमनेर तालुक्यातील घारगावमधील एका पंक्चर दुकान चालकावर सशस्त्र हल्ला करुन त्याची दुचाकी पळवून नेण्यासह, साकूरमधील एका पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाक दाखवून अडीच लाख रुपयांचा दरोडा घातल्याचीही कबूली दिली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला रविवार सविस्तर माहिती देणार आहेत.
प्रा. होले नगर शहरात कल्याण रोडवर जाधव पेट्रोल पंपाजवळ राहत होते. ते श्रीरामपूर शहरातील बोरावके महाविद्यालयात इतिहास विषयाचे प्राध्यापक होते. 23 फेब्रुवारीला त्यांच्या नातेवाईकांच्या लग्न हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर ते नातेवाईक अरूण नाथा शिंदे (वय 45 रा. नेप्ती ता. नगर) यांच्यासोबत केडगाव बायपास येथील हॉटेल के-नाईन समोरील एका बंद ढाब्याजवळ दारू पित बसलेले असतात तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.
या हल्ल्यात प्रा. होले यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या घातल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. एलसीबी पथकाकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता. लुटीच्या वेळी झालेल्या झटापटीत प्रा. होले यांची हत्या झाला असल्याची फिर्याद दाखल होती. दरम्यान यामागे दुसरे काही कारण आहे का ? याची पडताळणी पोलिसांनी केली. लुट करतेवेळी प्रा. होले यांनी केलेला विरोध न जुमानता लुटारूंनी त्यांना गोळ्या घातल्याचे तपासातून समोर आले आहे. याबाबत अधिकृत माहिती पोलीस अधीक्षक ओला रविवार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
26 फेब्रुवारी रोजी घारगावमधील एका पंक्चर दुकान चालकावर सशस्त्र हल्ला करुन त्याची दुचाकी पळवून नेण्यासह अवघ्या अर्धातासाच्या अंतराने याच तिघा दरोडेखोरांनी साकूर-मांडवे रस्त्यावरील आदिकराव खेमनर यांच्या भगवान पेट्रोलियम या पेट्रोलपंपावर दरोडा घातला होता. सुरुवातीला या तिघांनीही आपल्या ताब्यातील दोन्ही दुचाकीमध्ये पेट्रोल भरले व त्यानंतर थेट पंपावरील केबिनमध्ये घुसून तेथील दोघा कर्मचार्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून 2 लाख 50 हजार 747 रुपयांची रोकड घेवून तेथून लंपास झाले होते.
फुटेज पाहिल्यावर काढला माग
हत्येच्या घटनेनंतर एलसीबीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही ठिकाणच्या प्रत्यक्षदर्शीकडून माहिती मिळवण्यासह उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही फूटेजचे विश्लेषण करुन आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यातून राहुरी तालुक्यातील तिघांचा या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती मिळाल्यानंतर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एलसीबीचे कर्मचारी त्या तिघांच्याही मागावर होते. अखेर ते आपल्या घरी पतरल्यावर पोलिसांनी एकाचवेळी त्यांच्या घरावर छापा घालीत तिघांनाही ताब्यात घेतले आहे. सध्या ते तिघेही गुन्हे शाखेच्या ताब्यात असून त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून त्यांनी प्रा. होले यांच्या खुनासह घारगाव येथील लुट व साकूर येथील पेट्रोल पंपावरुन अडीच लाखांची रोकड लांबविल्याची कबुली दिली आहे. अतिशय सराईत असलेल्या या तिघांच्या टोळक्याने जिल्ह्यात अजूनही अनेक गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय असल्याने सध्या त्यांची एलसीबीकडून कसून चौकशी सुरु आहे.