मिरवणुकीत पोलीस अधिकारी जखमी, फिर्यादच नाही

एसपींकडून चौकशीचे आदेश; सावेडीतील घटना
मिरवणुकीत पोलीस अधिकारी जखमी, फिर्यादच नाही

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवर डीजेच्या तालावर नाचणार्‍या युवकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्याचे पर्यावसन हाणामारी व किरकोळ दगडफेकीत झाले. यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीमारही करण्यात आला. मात्र, या गोंधळात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी जखमी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेसंदर्भात तोफखाना पोलिसांकडून अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवर पेट्रोल पंपाजवळ गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी युवकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यावेळी हाणामारी व किरकोळ दगडफेकीत झाले. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मात्र, या सर्व गोंधळात तोफखाना पोलीस ठाण्यातील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. घटनेवेळी झालेल्या दगडफेकीमुळे अधिकारी जखमी झाल्याची चर्चा आहे.

मात्र, युवकांना पांगवण्यासाठी प्रयत्न करत असताना एका पोलीस कर्मचार्‍याची लाठी संबंधित पोलीस अधिकार्‍याला लागल्यामुळे ते जखमी झाल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगितले जात आहे. दोन दिवस लोटले तरी यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याने चर्चांना उधाण आले होते. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक पाटील यांनी या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकाडे व तोफखाना पोलिसांना दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com