
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त नगर शहरात रविवारी (दि. 1) काढण्यात आलेल्या मिरवणुकीत लावण्यात आलेल्या डीजेच्या आवाजाची पातळी ओलांडली असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासणीतून समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार योगेश खामकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात तीन यंग पार्टीचे अध्यक्ष व डीजे मालक यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटीचे उल्लंघन करत ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
जश्ने ईद मिलाद कमिटी तख्ती दरवाजा पार्टीचे अध्यक्ष शहा फैसल बुर्हान सय्यद (रा. तख्ती दरवाजा) व डीजे मालक विनायक पोपट चव्हाण (रा. बाबुर्डी घुमट ता. नगर), सहारा सोशल युथ फांउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष लतीफ अल्ताफ खान (रा. तांबटकर गल्ली, नगर) व डीजे मालक नागेश मच्छिंद्र लोखंडे (रा. वैदूवाडी, सावेडी), जंगे शाहिद यंग पार्टी, संजयनगरचे अध्यक्ष वसिम नईम शेख (रा. काटवन खंडोबा) व डीजे मालक कृष्णा माणिक घाडगे (रा. राहुरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.