हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनामुळे संगमनेरातील 4 कत्तलखाने सील

हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनामुळे संगमनेरातील 4 कत्तलखाने सील

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने उध्वस्त करावे या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे शहरातील चार कत्तलखाने त्वरित सील करण्यात आले आहेत. कत्तलखाने उद्ध्वस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल केली जात आहे. शहरातील जमजम कॉलनी व परिसरात खुलेआम बेकायदेशीर कत्तलखाने चालवली जातात. हे कत्तलखाने बंद करावे व सराईत गुन्हेगारांना तडीपार करावे या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. अधिकार्‍यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. नगरपालिका व पोलीस प्रशासनाने रात्री साडेदहा वाजता शहरातील चार कत्तलखाने सील केले.

संगमनेर शहरात सुमारे दहा कत्तलखाने सुरू आहे. यातील अवघे चार कत्तलखाने सिल करण्यात आल्याने उर्वरित कत्तलखान्यावर कारवाई कधी करणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे. येत्या दोन दिवसात सर्व कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याची लेखी हमी अधिकार्‍यांनी दिली आहे. पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचीही लेखी हमी दिल्याने या कारवाई कडेही अनेकांचे लक्ष लागून आहे.

संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या दुर्लक्षामुळेच शहरात बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याचे हिंदूत्ववादी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे. याबाबत हिंदुत्ववादी संघटना व संगमनेर शिवसेना पदाधिकारी यांनी देखील नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख त्यांच्याबाबत काय निर्णय घेतात याकडेही अनेकांचे लक्ष लागून आहे.

जैन यांनी वाचा फोडल्याने तीव्रता वाढली

संगमनेर शहरात अनेक वर्षांपासून बेकायदेशीर कत्तलखाने खुलेआम सुरू आहेत. या कत्तलखान्यांत शेकडो गायींची कत्तल होत असताना पोलीस प्रशासनाचे कत्तलखान्याकडे दुर्लक्ष झाले होते. भिवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते यतीन जैन यांनी या प्रकरणात लक्ष घालून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर नाशिक व अहमदनगर येथील पोलिसांनी संगमनेर येथे येऊन कत्तलखान्यावर कारवाई केली. यानंतर कत्तलखान्याच्या प्रश्नाची तीव्रता वाढली. शहरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी मोर्चा काढून प्रांताधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. कत्तलखान्याची संपूर्ण जबाबदारी शहर पोलिसांची असूनही त्यांचे या कत्तलखान्याकडे दुर्लक्ष झाले होते. आर्थिक संबंधामुळेच हे कत्तलखाने सुरू असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. जिल्हा पोलीस प्रमुख आता पोलीस निरीक्षकांवर कोणती कारवाई करणार याकडे संगमनेरकरांचे लक्ष आहे.

Related Stories

No stories found.