श्रीगोंदा|ता. प्रतिनिधी| Shrigonda

अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यामध्ये नुकत्याच ७६७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांसाठी जिल्ह्यातील २३ हजार ८१८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

या सर्व उमेदवारांना दैनंदिन निवडणूक खर्च आणि अंतिम एकत्रित निवडणूक खर्च द्यावा लागणार आहे. अंतिम खर्च घेताना त्यांचे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र घेण्याचा प्रयत्न काही शासकीय अधिकारी करीत आहेत. हा प्रयत्न शासनाच्या धोरणाच्या विरोधात असल्याने जिल्ह्यातील या उमेदवारांना २३ लाख ८१ हजार ८०० रुपयांचा विनाकारण भुर्दंड देऊ नये. अशी मागणी श्रीगोंदा तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांनी केली आहे.

प्रा.दरेकर म्हणाले, महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागाकडील आधिसूचना क्रमांक मुद्रांक २००४/२६३६ प्र.क्र. ४३६ /म -१ दि. १ जुलै २००४ अन्वये जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र ,राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये यांचे समोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे. उपरोक्त नमूद कामाकरिता मुद्रांक (स्टॅम्प पेपर) विकत घेण्याची आवश्यकता नाही. असे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र शासन यांनीही जाहीर केलेले आहे.

शासनाच्या धोरणाप्रमाणे ग्रामपंचायत उमेदवारांचा एकत्रित अंतिम खर्च घेताना त्यांचे शपथपत्र (घोषणा पत्र ) साध्या कागदावर घेणे गरजेचे आहे. १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही. असे असताना शासकीय धोरणांचा अभ्यास न करणारे अधिकारी विनाकारण लाखो रुपयांचे स्टॅम पेपर घेण्यास भाग पाडीत आहेत. ही बाब चुकीची आहे.

श्रीगोंदा तालुक्यामध्ये ५९ ग्रामपंचायतीमधील ५६७ जागांसाठी २ हजार १६३ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. त्यांचे अंतिम खर्च घेताना त्यांना शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर घेण्यास भाग पाडल्यास त्यांना विनाकारण २ लाख १६ हजार ३०० रुपयांचा नाहक भुर्दंड बसणार आहे.

शासनाच्या धोरणाच्या विरोधात जे अधिकारी विनाकारण शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर उमेदवारास घ्यावयास लावतील, त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने कायदेशीर कारवाई करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकारात लक्ष घालून उमेदवाराचा भुर्दंड वाचवावा, अन्यथा या प्रकाराबाबत न्यायालयात धाव घ्यावी लागेल. असेही प्रा. दरेकर म्हणाले.