खासगीकरण व कंत्राटी भरती विरोधात शनिवारी संगमनेरात जनआक्रोश मोर्चा

खासगीकरण व कंत्राटी भरती विरोधात शनिवारी संगमनेरात जनआक्रोश मोर्चा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

महाराष्ट्र सरकार शिक्षणाच्या खाजगीकरणासह विविध क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय राबवित आहे. या जुलमी व अत्याचारी निर्णयाविरोधात संगमनेर तालुक्यातील विविध शासकीय, निमशासकीय संघटनांसह विद्यार्थी पालकांचा सहभाग असलेला जन आक्रोश मोर्चा शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वा यशोधन कार्यालय येथून निघणार असून प्रांत कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती समन्वय समितीने दिली आहे.

विद्यार्थी पालक शासकीय निमशासकीय कर्मचारी समन्वय समितीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अनेक भूलथापा देऊन 2014 मध्ये भाजपा सरकार सत्तेवर आले. दरवर्षी दोन कोटी नोकर्‍यांचे आमिष दाखवणार्‍या या सरकारने अनेक सरकारी कंपन्या बंद करून त्याचे खाजगीकरण केले आहे.

आता नव्याने शिक्षण क्षेत्रात खाजगीकरणासह विविध विभागात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा जुलमी निर्णय घेतला आहे. यामुळे गोरगरीब जनता शिक्षणापासून वंचित राहणार असून भविष्यात गरीब आणि श्रीमंत अशी मोठी दरी निर्माण होणार आहे.

शिक्षणाचे खाजगीकरण व कंत्राटी प्रक्रियेला समाजामधून मोठा विरोध होत असून हा जुलमी निर्णय थांबवण्यासाठी संगमनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालय, शिक्षक, शिक्षकेतर संघटना, सर्व अकॅडमी, आरोग्य, तलाठी, ग्रामसेवक संघटना, सर्व अंगणवाडी, लिपिक संघटना, शेतकरी, सरपंच, बिडी कामगार, आदिवासी, बांधकाम कामगार, वारकरी संघटना, संस्था व्यवस्थापन, अधिकारी, कर्मचारी संघटना, सर्व सहकारी बँका, सरकारी बँका, विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना या सर्व संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न होऊन संगमनेरमध्ये शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11 वा. यशोधन कार्यालय येथून हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये जन आक्रोश मोर्चा निघणार आहे.

नाशिक पुणे हायवेवरून संगमनेर बस स्थानकावरून प्रांत कार्यालयावर हा जन आक्रोश मोर्चा धडकणार आहे. तरी या जनआक्रोश मोर्चामध्ये तालुक्यातील सर्व सेवाभावी संघटना, विद्यार्थी, पालक, शासकीय, निमशासकीय कर्मचारी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी असे आवाहन समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com