खासगी व्यापार्‍यांकडून होतेय शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक

शासकीय खरेदीकेंद्र बंद; खरेदी-विक्री संघामार्फत मूग, तूर खरेदी करण्याची मागणी
खासगी व्यापार्‍यांकडून होतेय शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक

अहमदनगर |तालुका प्रतिनिधी| Ahmednagar

शासकीय खरेदीकेंद्र बंद असल्यामुळे शेतकर्‍यांना नाविलाजाने आपला शेतमाल खासगी व्यापार्‍यांना अत्यंत कमी दराने विक्री करावा लागत

असून शेतकर्‍यांची प्रचंड आर्थिक पिळवणूक होत आहे. फेडरेशन व खरेदीविक्री संघामार्फत तातडीने मूग, तूर, कांदा, सोयाबीन आदींची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सभापती प्रवीण कोकाटे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, गोविंद मोकाटे, शरद झोडगे, माजी सभापती रामदास भोर यांनी जिल्हा उपनिबंधक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नगर तालुका व परिसरातील शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने चालू खरीप हंगामातील शेतमाल तयार केला आहे. परंतु शासकीय खरेदी बंद असल्यामुळे खासगी व्यापार्‍यांकडे मालाची विक्री करावी लागत आहे. हे व्यापारी अत्यंत कमी दराने माल विकत घेत असून शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.

सुदैवाने यावर्षी पाऊस वेळेवर झाल्यामुळे पीक जोमात आले आहे. परंतु अतिवृष्टीने काही ठिकाणी नुकसान झाले आहे व आता माल चांगला असूनही तो कमी दरात विक्री होत असल्यामुळे शेतकर्‍यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून त्वरित फेडरेशन व खरेदीविक्री संघास सूचना करून शेतमालाची खरेदी सुरू करण्यात यावी. अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही कोकाटे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com