खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेकडे कल

तालुक्यात खासगी शाळेतील 500 हून अधिक विद्यार्थ्यांचा जि.प शाळेत प्रवेश
खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेकडे कल

राहाता |संकेत सदाफळ| Rahata

कोविड संकटात ऑनलाइन तसेच ऑफलाईन शिक्षणावर भर देत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी पटसंख्या वाढवण्यात यशस्वी कामगिरी केली आहे. इंग्रजी माध्यमांकडे असलेला पालकांचा ओढा कमी झालेला असून जिल्हा परिषद शाळांना पालकांनी पसंती दर्शवली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात इतर शाळा व इंग्रजी शाळेतील तब्बल 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी जि. प. शाळेत प्रवेश घेतला आहे.

कोविड संकटात शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणाची वेळ शाळांवर आली. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनीही ऑनलाइन शिक्षणावर भर दिला. कोविड संकटात अनेकांचे अर्थकारण कोलमडले, रोजगार बूडाले. त्यामुळे शालेय फी भरणे पालकांना दुरापास्त होवून बसले. फी भरली नाही तर ऑनलाइन शिक्षणही नाही असा मार्ग बहूतांशी शाळांनी निवडला. ग्रामीण भागात तर इंटरनेट मिळत नसल्याने ऑनलाइन शिक्षणात खोडा झाला. पाल्याच्या शिक्षणाची गैरसोय होत असल्याने पालकांचे मानसिक स्वास्थ्यही बिघडले.

दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शक्य तिथे ऑनलाइन तर जिथे शक्य नाही तेथे ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देत होते. वाड्या-वस्त्यांवर जावून तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत होते. पालकांशी सुसंवाद साधत होते. आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास उंचावत गेला. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी केलेल्या कामाचे चिज तर झालेच झाले पण इतर पालकांनाही जिल्हा परिषद शाळेकडे आकर्षण वाढू लागले. मोफत शिक्षण, प्रत्यक्ष संवाद, गुणवत्ता सुधार, सेमी इंग्रजी यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश वाढू लागले आहेत.

ऑनलाइन व ऑफलाइन अध्ययन, अध्यापन करताना शासनाचे दिक्षा अ‍ॅप, सेतू अभ्यासक्रम, शिकू आनंदे इत्यादी उपक्रमामुळेही विद्यार्थी पुन्हा अभ्यासाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न जिल्हा परिषद शिक्षक करीत आहेत.

अपवाद वगळला तर तालुक्यात खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडून दरवर्षी फी वाढ होत आहे. ज्यांना फी भरणे शक्य आहे त्यांना ऑनलाइन शिक्षणाचा लाभ मिळत आहे. मात्र शिक्षण क्षेत्रात गरीब-श्रीमंत दरी पुन्हा वाढू लागली आहे. कोविड संकटापूर्वी इंग्रजी शाळांमध्येच प्रवेश मिळावा यासाठी सामान्य पालकही आग्रह करत होते. कोविड नंतरची परिस्थिती बदलली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्येही उच्च दर्जाचे शिक्षण मिळत आहे. अनेक गावातील जि. प. शाळेचे रुप पालटले आहे. स्थानिक ग्रामस्थ, पालक व शिक्षकांच्या प्रयत्नातून सुंदर शाळा, स्वच्छ शाळा निर्माण होवू लागल्या आहेत. परिस्थिती आता बदलू लागली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांचा टक्काही वाढला आहे.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात काम सुरू आहे. गटशिक्षण अधिकारी पोपट काळे, निवृत्त विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, शिक्षकांनी परिश्रम घेतले. वाड्या-वस्त्यांवर जाऊन प्रत्यक्ष काम केले. अभ्यास करून घेतला. विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना शिकवण्यात आले. खाजगी शाळा फक्त फी करिता काम करतात तर जि. प. शिक्षक तळमळीने काम करत आहेत.

- ओमेश जपे, उपसभापती पंचायत समिती, राहाता

शाळा बंद असताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ऑफलाईनच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले. पालकांचा विश्वास संपादन केला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शासन धोरणाप्रमाणे ऑनलाईन निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, साक्षरदिन व शिक्षकदिनी विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले. दारात, घरात, ओट्यावर विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. मातृभाषेतून शिक्षण दिल्याने बालवयात विद्यार्थ्यांचा मानसिक विकास झाला.

- पोपट काळे, गटविकास अधिकारी

खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तळमळीने शिकवतात. पालकांना ते भावत आहे. पाया पक्का होताना पाल्याची शैक्षणिक प्रगती दिसून येत आहे. कोविड संकटात अनेकांचे रोजगार बुडाले. फीची समस्या भेडसावली. तुलनेत जि. प. मोफत शिक्षण देते. शिक्षकांच्या गृहभेटी, सायंकाळी वेळ काढून शिकवणे आणि पालकांशी होत असलेला सुसंवाद हे प्रवेश वाढीचे कारण आहे.

- समर्थ शेवाळे, गटविकास अधिकारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com