देवळालीत तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खासगी सावकारकी करणार्‍या शेतीमाल व्यापार्‍याच्या तगाद्याला कंटाळून
देवळालीत तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका कदम नामक अविवाहित तरूण शेतकर्‍याने एका व्यापार्‍याच्या खासगी सावकारकीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. हा खासगी सावकार राहुरीत शेतमाल विकणारा एक व्यापारी असून त्याने कदम नावाच्या तरूणाला व्याजाच्या पैशाचा तगादा करून वेळोवेळी धमकी दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्या व्यापार्‍यावर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. या सावकाराने गावासह तालुक्यातही अनेकांना सावकारी व्याजाने पैसे दिले असून तगादा करून अनेकांना धमकी दिल्याची चर्चा होत आहे.

सध्या त्या कदम नावाच्या तरूणावर विवेकानंद नर्सिंग होम येथे उपचार सुरू असून खासगी सावकारीच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे चर्चेतून समजले. राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरा रोडवर वास्तव्यास असलेल्या या तरुणाने एका शेडमध्ये विष प्राशन केले. त्यानंतर त्यास त्रास होऊ लागल्याने शेतातून पळत असताना काहींनी त्यास पाहिले. त्यानंतर विष प्राशन केलेल्या तरुणास तातडीने राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान त्या तरुणाने नराचा नारायण झालेल्या त्या खासगी सावकाराच्या छळामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे चर्चेतून समजते. आत्महत्या करणार्‍या तरुणाने एका ग्रुपवर खासगी सावकाराचे नाव घेऊन गेल्या काही दिवसांपूर्वीचा चर्चा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओत तो तरुण, व्यापारी व मध्यस्थ दिसून येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

सहा पानी चिठ्ठी

त्या कदम नावाच्या तरूणाने विष प्राशन करण्यापूर्वी सहा पानी चिठ्ठी लिहीली असून त्यात त्या सावकाराच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती तरूणाच्या नातेवाईकांनी दिली. सन 2014 साली त्या सावकाराकडून शेतीसाठी व्याजाने पैसे घेण्यात आले. मात्र, मुद्दलासह अनेक पटींनी व्याज त्या सावकाराने वसूल केले असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. ही चिठ्ठी आता पोलिसांच्या स्वाधीन करणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com