खासगी सावकारकीविरूद्ध कर्जत पॅटर्न ठरतोय दिशादर्शक

22 प्रकरणांत पोलीसांची भूमिका निर्णायक
खासगी सावकारकीविरूद्ध कर्जत पॅटर्न ठरतोय दिशादर्शक

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत पोलिसांनी खासगी सावकारकीविरुद्ध राबवलेली मोहीम जिल्ह्यात दिशादर्शक ठरली आहे. मार्गील वर्षभरात तालुक्यातील जुलमी खासगी सावकारकीचे कंबरडे मोडून नागरिकांची पिळवणूक थांबण्यास मदत झाली आहे. 22 प्रकरणांतील 12 प्रकरणांत सावकारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर 10 प्रकरणांत तडजोड होऊन मिटले आहे.

कायम दुष्काळी म्हणून गणना असलेल्या कर्जत तालुक्यात सावकारकी हा अनेकांचा पिंड बनला आहे. अनेक मातब्बर मंडळी खासगी सावकारकीच्या धंद्यात आपला पाय रोवून उभी होती. टक्केवारीच्या मनमानी आकड्यात अन् चक्रवाढ व्याजात अनेकांच्या जमिनी व आयुष्यभराची कमाई गेली. सावकारांकडून पैशांसाठी होत असलेला कौटुंबिक अत्याचार, मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान यात अनेक कुटुंबांची वाताहत झाली.कर्जत तालुका अशा ‘व्हाईट कॉलर’ लुटारुंचे जणु माहेरघरच बनला होता.

कर्जत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव व वर्षभरापूर्वी कर्जतच्या पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारलेले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सावकारकीची पाळेमुळे हलवली. सावकार व सावकारकीच्या विरुद्ध नागरिकांना आवाहन करून अभय दिले. सोशल मीडियावर प्रभावी जनजागृती केली आणि वर्षभरात सावकारकीच्या तब्बल 22 तक्रारी पोलीस ठाण्यात आल्या. यातील 10 प्रकरणांत परस्पर तडजोड होऊन केवळ मुद्दल घेण्याच्या अटीवर तडजोडी झाल्या. तर 12 प्रकरणात सावकारांवर गुन्हे दाखल केले. याद्वारे एकूण 1 कोटी 87 लक्ष 1 हजार रुपयांची मालमत्ता संरक्षित करण्यात पोलिसांना यश आले आहे. कर्जत पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाया आणि लावलेल्या अवघड तपासांमुळे पोलीस अधीक्षक सौरभ पाटील यांच्यावतीने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या टीमला गौरविण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com