खासगी आयटीआयमधील सर्वच मागास प्रवर्गांना आता शिष्यवृत्ती

शासनाच्या अध्यादेशामुळे विद्यार्थ्यांवरील भार होणार कमी
खासगी आयटीआयमधील सर्वच मागास प्रवर्गांना आता शिष्यवृत्ती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खासगी आयटीआयमध्ये प्रवेश घेणार्‍या सर्व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता स्कॉलरशीप मिळणार आहे. तसा अध्यादेश शासनाने नुकताच काढला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग या प्रवर्गातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती विखे पाटील आयटीआयचे प्राचार्य राम क्षीरसागर यांनी दिली.

खुल्या प्रवर्गातील जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्युएस) असतील त्यांना व मुस्लीम, पारशी, जैन, ख्रिश्चन व बौद्ध या सारख्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना देखील शासनाकडून स्कॉलरशीप योजना लागू करण्यात आलेली आहे. खासगी व शासकीय आयटीआयची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 15 जुलैपासून सुरू झालेली असून 31 ऑगस्ट 2021 पर्यंत फॉर्म भरता येतील. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या आधारे ऑनलाईन प्रवेश फॉर्ममधील सुरुवातीचे तीन टप्पे पूर्ण करणे गरजेचे आहे.

प्रथम टप्प्यामध्ये ऑनलाईन अ‍ॅडमिशन रजिस्ट्रेशन करणे, दुसर्‍या टप्प्यामध्ये अर्ज कन्फरमेशन करणे व तिसर्‍या टप्प्यामध्ये ऑप्शन फॉर्म भरणे म्हणजेच आयटीआयचे नाव, कोणत्या ट्रेडला प्रवेश घ्यावयाचा आहे, त्याची निवड करणे आवश्यक आहे. फॉर्मचे तीनपैकी काही टप्पे पूर्ण न केल्याने सदर विद्यार्थ्यांची नावे मेरिट लिस्टमध्ये येत नाहीत व त्यामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीची आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित आयटीआयमध्ये संपर्क साधल्यास त्यांना त्यांचा प्रवेश प्रक्रियेतील सर्व टप्प्यांचे फॉर्म भरून देण्याची व्यवस्था केल्याने अचूकपणे फॉर्म भरून दिले जातात, असे प्राचार्य क्षीरसागर म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com