खाजगी संस्था व कोचिंग क्लासेसकडून विद्यार्थ्यांची लूट

खाजगी संस्था व कोचिंग क्लासेसकडून विद्यार्थ्यांची लूट

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

अकरावी, बारावीच्या प्रवेशात काही खाजगी शिक्षण संस्था विद्यार्थी व पालकांची लुट करत आहेत. शिक्षण संस्थेत प्रवेश द्यायचा व खाजगी कोचिंग क्लासेस वाल्यांना लाखो रुपयांची फी घेऊन तेथे विद्यार्थ्यांना पाठवायचे असा प्रकार होत असल्याचे शारदा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचा असणारा टप्पा म्हणजे इयत्ता दहावी व बारावी.नुकताच इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल लागलेला आहे. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याचा प्रवेश करणे म्हणजे अत्यंत महत्त्वाचे वाटते. इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण होऊन अकरावी प्रवेश कुठे घ्यावा? कसा करावा? हा पालकांपुढे मोठा प्रश्न असतो. परंतु पालकांची व विद्यार्थ्यांची दिशाभूल करणार्‍या अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिलेल्या आहेत. शिक्षण संस्था, ज्ञान देण्यापेक्षा पैसे मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना व पालकांना नेताना दिसून येत आहेत. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांमध्ये खाजगी कोचिंग क्लासेस व काही शिक्षण संस्थांकडून मात्र त्याचा मोठा फायदा उठवण्याचा प्रयत्न चालू आहे.

आजची परिस्थिती पाहता काही कॉलेजमध्ये फक्त प्रवेश घ्यायचा ,त्यांची मोठ्या प्रमाणात असलेली फी पेड करायची व खाजगी क्लासमध्ये लाखो रुपये देऊन विद्यार्थ्यांना पाठवायची अशी वस्तुस्थिती आहे. शासन एका बाजूला पट पडताळणी आधार व्हॅलिडेशननुसार शिक्षकांची संच मान्यता करण्याचा प्रयत्न करते आहे. परंतु दुसर्‍या बाजूला कुठल्याही प्रकारचा प्रवेशाचा निकष न लावता कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही शाखेमध्ये शासनाच्या प्रवेश प्रक्रियेचा कुठल्याही प्रकारचा वापर न करता प्रवेश देत आहे.त्यातून पालकांची आर्थिक लूट होताना दिसत आहे. आजची परिस्थिती पाहता अशी काही कॉलेज आहेत की त्याठिकाणी फक्त कागदावर विद्यार्थी आहेत व कॉलेजमध्ये कुठल्याही लेक्चर्स अथवा प्रॅक्टिकल्स होताना दिसत नाही.

मग हे विद्यार्थी खाजगी क्लासला जाऊन सी ई टी ,नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षा देतील व नंतर अभियांत्रिकी व मेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेश घेतील .परंतु इयत्ता अकरावी व बारावीमध्ये त्यांना प्रॅक्टिकलची संधी मिळाली नसेल तर ते पुढे उत्कृष्ट दर्जाचे डॉक्टर व इंजिनिअर कसे तयार होतील हाही प्रश्न आहे. प्रवेशासाठी खोटे आश्वासन देऊन आमच्याकडे फक्त परीक्षेसाठी या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पास करून देणारे सुद्धा काही कॉलेज दिसत आहेत. शिक्षण विभाग आधार कार्ड, व्हॅलिड, इन प्रोसेस या गोष्टीवर कॉलेज शाळांची पट पडताळणी व संचमान्यता करत असेल तर प्रत्यक्ष वर्गामध्ये विद्यार्थी किती आहे.

त्यांची दैनंदिन वर्गातील उपस्थिती तपासून पाहणे तितकेच महत्त्वाचे वाटते. वेगवेगळ्या कारणांनी होणारी पालकांची व विद्यार्थ्यांची फसवणूक दिशाभूल थांबण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे वाटते, या सर्व गोष्टी जर झाल्या तरच येणारी पिढी ही शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होईल व आज शिक्षणाचा जो बाजार मांडलेला आहे, तो थांबेल.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com