‘त्या’ बिलासाठी मनसेचे 5 मार्चला आंदोलन

नितीन भुतारे । खासगीच्या बिलाचा परतावा कलेक्टरही विसरले
‘त्या’ बिलासाठी मनसेचे 5 मार्चला आंदोलन

अहमदनगर (प्रतिनिधी) -

करोना उपचारात जास्तीची रक्कम घेणार्‍या खासगी डॉक्टरांवर कारवाई करून ती रक्कम संबंधित रुग्णांना परत केली जाईल

असं आश्‍वासन कलेक्टरांनी दिलं खरं, पण त्यांनाही त्याचा विसर पडला आहे. आता रुग्णांना जास्तीचे पैसे परत मिळावे यासाठी मनसे पाच मार्चला रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती नितीन भुतारे यांनी दिली.

करोना आजारावर उपचार घेणार्‍या खाजगी हॉस्पीटलमधील वाढीव बिलांची शासन नियमांप्रमाणे जिल्हाधिकार्‍यांमार्फत तपासणी केली. त्यात अनेक हॉस्पिटलकडे वसुलीपात्र रक्कम दाखविली. मात्र खाजगी हॉस्पिटलवाले करोना रूग्णांना वाढीव बिलाचे पैसे परत देत नसल्यामुळे मनसेने शरद पवार यांच्या दौर्‍यात काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी कलेक्टरांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. एसपीही बैठकीला उपस्थित होते. महिनाभराच्या आत खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना त्यांच्या वाढीव बिलांची रक्कम परत मिळवून देऊ असा शब्द कलेक्टरांनी दिला होता. महिन्याची मुदत संपली तरी अजूनही कलेक्टरांनी शब्द पाळला नसल्याचा आरोप भुतारे यांनी केला आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांसारखेच कलेक्टरही खासगी हॉस्पिटलच्या मागे उभे राहत आहे. जिल्ह्यात करोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरूवात केली असून खासगी हॉस्पिटलमध्ये पुन्हा लूट होईल. ती होऊ नये यासाठी मनसेचे पाठपुरावा सुरू असल्याचे भुतारे यांनी सांगितले.

खासगी हॉस्पिटलमध्ये करोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांना वाढीव बिलांची रक्कम परत मिळण्याकरिता पाच मार्चला मनसे रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा नितीन भूतारे यांनी दिला आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र रशिंकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, महिला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड अनिता दिघे, विनोद काकडे यावेळी उपस्थित होते.

शरद पवारांचे आश्‍वासनही हवेत

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांना निवेदन देत मनसेने या प्रश्‍नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी खा. पवार यांनी आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा करुन हा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन दिले होते. परंतू त्यांचे हे आश्‍वासनही हवेत विरले. पवारांनीही कलेक्टरांसारखा जनतेचा विश्‍वासघात केल्याचा आरोप नितीन भुतारे यांनी केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com