खाजगी रुग्णालयांना बाधित व्यक्तीची माहिती देणे बंधनकारक
सार्वमत

खाजगी रुग्णालयांना बाधित व्यक्तीची माहिती देणे बंधनकारक

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आदेश जारी

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे करोना सेंटर सुरू केल्याची आणि स्त्राव घेतलेल्या व्यक्ती व बाधित व्यक्तींची माहिती तातडीने प्रशासनास सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काढले आहेत.

जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी करोना सेंटर सुरू करून त्या ठिकाणी स्त्राव घेणे व करोना बाधित रुग्णांना दाखल करून उपचार करणे सुरू केलेले आहे. संबधित रुग्णालयांना स्त्राव घेतलेल्या व्यक्तींची माहिती तसेच करोना बाधित रुग्णांची माहिती व अहवाल जिल्हा शल्य चिकीत्सक यांना कळविणे बंधनकारक आहे.

परंतु खाजगी रुग्णालयांकडून कोविड सेंटर सुरू केल्याबाबतची माहिती व स्त्राव घेतलेल्या रुग्णांची माहिती प्रशासनास प्राप्त होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे करोना सेंटर सुरू केल्याची, तसेच रुग्णालयामध्ये असलेल्या बेडची संख्या, आयसीयू बेडची संख्या व व्हेंटिलेटरची संख्या तातडीने ग्रामीण भागामध्ये तालुका आरोग्य अधिकारी व महानगरपालिका हद्दीमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा यांना विहित प्रपत्रात कळविणे बंधनकारक आहे.

खाजगी रुग्णालये-प्रयोगशाळा (लॅब) यांना स्त्राव घेताना संबंधित व्यक्तींच्या ऑक्सिजनच्या प्रमाणाची तपासणी करावी. ते कमी आढळ्यास तातडीने ग्रामीण भागामध्ये तालुका आरोग्य अधिकारी व महानगरपालिका हद्दीमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा यांना कळविणे बंधनकारक आहे.

खासगी प्रयोग शाळेमध्ये बाधित आढळणार्‍या करोना रुग्णावर घराऐवजी रुग्णालयात आयसोलेशन करून उपचार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. खाजगी रुग्णालयांना त्यांच्याकडे दाखल असलेल्या करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती कॉन्टॅक्ट ट्रेसिंग दरम्यान प्रशासनास देणेे बंधनकारक राहील. खाजगी रुग्णालयांनी उपचार घेत असलेल्या करोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती विहित नमुन्यात जिल्हा शल्यचिकीत्सक, यांच्याकडे सादर करणे बंधनकारक राहील. खाजगी रुग्णालयांकडून स्त्राव घेतलेल्या व कोरोना बाधित व्यक्तींबाबतची प्राप्त माहिती तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा, नगर यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना कळवावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com