
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा रुग्णालयातील करोना आयसीयूत झालेल्या अग्नीतांडवानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील खासगी रुग्णालय, निवासी खासगी रुग्णालये यांच्या इमारतीचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या 15 डिसेंबरपर्यंत ही तपासणी करून त्याचा सविस्तर अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला सादर करण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैधानिक अधिनियम, कायदा यांच्या मान्यतेनुसार महाराष्ट्र शुश्रृषागृहे नोदणी अधिनियम 1949, (सुधारित 2021 अन्वये) ग्रामीण भागातील खासगी हॉस्पिटलची नोंदणी आणि नुतनीकरण जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे करणे बंधनकारक आहे. स्थानिक पातळीवर ही तपासणी करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना तपासणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहे. शासनाच्या नियमानुसार ग्रामीण भागात आर्थिक वर्षात दोन तपासणी होणे आवश्यक आहे.
ही तपासणी करताना संबंधीत रुग्णालय, खासगी रुग्णालय यांचे फायर ऑडिट झालेले आहे की नाही, त्या ठिकाणी अग्नी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झालेली आहे की नाही, याचा सविस्तर प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य विभागास सादर करण्यास सांगण्यात आलेले आहे. ही तपासणी झाल्यानंतर संबंधीत खासगी रुग्णालय, दवाखाना संबंधींच्या नोंदणी अथवा नुतणीकरणाच्या प्रस्तावास मंजूर द्यावी की नाही, याबाबतचा स्वंयस्पष्ट अभिप्राय आपल्या अहवालात जिल्हा परिषदेला सादर करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी नोंदणी न करताच खासगी रुग्णालये अथवा दवाखाने सुरू असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करून त्याचाही अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिले आहेत.
बोगस डॉक्टरांची शोध मोहिम होणार
ग्रामीण भागातील खागसी रुग्णालये आणि दवाखान्यांच्या परवागनीची शोध मोहिम घेतांना बोगस डॉक्टर यांची देखील शोध मोहिम पूर्ण होणार आहे. येत्या 15 डिसेंबरपर्यंत यासाठी कालावधी देण्यात आलेला आहे.
अहवालाच्या प्रत्येक पानावर सही
ग्रामीण भागातील खासगी रुग्णालये आणि दवाखाने यांची तपासणी अहवालाच्या प्रत्येक पानावर तालुका वैद्यकीय अधिकारी यांची सही सक्तीची करण्यात आलेली आहे. तसेच अहवालात स्थळ, वेळ आणि तारीख यांचा सुस्पष्ट उल्लेख करण्याचे जिल्हा आरोग्य अधिकार्यांच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.