खासगी हॉस्पिटलच्या अवाच्या सव्वा बिलापायी रुग्णांचे हाल

शासकीय दरपत्रक दर्शनी भागात लावावे : लहुजी सेना
खासगी हॉस्पिटलच्या अवाच्या सव्वा बिलापायी रुग्णांचे हाल

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

जिल्ह्यात करोना संसर्गाचा वेग गेल्या आठ दिवसांपासून वाढल्याने जिल्ह्यातील रुग्णाचे प्रमाण अधिक वाढले आहे.

करोना आजारावर उपचार घेण्यासाठी शासकीय हॉस्पिटल व खासगी हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याने रुग्ण व नातेवाईकांना वेळेत उपचार मिळत नसल्याने मोठ्या मानसिक संकटाचा सामना करावा लागत आहे. हे सर्व चालू असताना शिर्डी परिसरातील काही खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलेल्या रुग्णांकडून अवाच्या सव्वा बिलाची मागणी होताना दिसत आहे.

राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी खासगी हॉस्पिटलने सरकारी दराप्रमाणे बिले आकारून करोना रुग्णाला उपचार द्यावे असे आदेश असतानाही तहसीलदाराचे आदेश जणू खासगी हॉस्पिटलने जुगारून लावल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याबाबत करोना दक्षता समिती यांनी संबंधित हॉस्पिटलची पाहणी करणे आवश्यक आहे.

रुग्णाकडून उपचारासाठी घेणारी फी ही सिसिटीव्ही फुटेज मधूनच घेतली पाहिजे तर संबंधित हॉस्पिटलचे बिल बुक तपासून पैसे घेताना वेगळे पुस्तक तर शासनाला दाखविण्यासाठी वेगळे पुस्तक असा सपाटा खासगी हॉस्पिटलमध्ये पहावयास मिळत आहे. करोना आजार हा बरा होणारा आजार असल्याने वेळेत उपचार घेऊन रुग्ण बराही होतो.

मात्र सर्वसामान्य माणूस या आजाराच्या बिलामुळे त्रस्त झाला आहे. तरी राहाता तालुका शासकीय दक्षता समितीने यात त्वरित लक्ष घालून संबंधित रुग्ण व नातेवाईकांना न्याय द्यावा, अशी मागणी भारतीय लहुजी सेनेच्यावतीने प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

साई आश्रममधील शासकीय करोना उपचार केंद्र फुल्ल झाल्याने उपचारासाठी बेड मिळत नाही. मात्र उपचार घेणे गरजेचे असल्याने रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र उपचारासाठी अवाच्या सव्वा फी मागणी करणार्‍या हॉस्पिटलवर प्रतिबंधक कारवाई करणे गरजेचे झाले असून उपचार नको अशी अवस्था सध्या करोनाच्या रुग्णावर व नातेवाईकावर येऊन ठेपली आहे. या परिस्थितीची समक्ष पाहणी भारतीय लहुजी सेनेच्या पदाधिकार्‍यांनी संबंधित हॉस्पिटलमधील रुग्णांना भेटून अवाच्या सव्वा फी घेतली असल्याची माहिती पदाधिकार्‍यांनी घेतली आहे.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनाही निवेदन देऊन माहिती देणार असल्याचे भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, प्रदेशाध्यक्ष सुरेश अडांगळे, सचिव हनिफ पठाण, जिल्हाध्यक्ष रजाक शेख, प्रदेश सरचिटणीस रामभाऊ पिंगळे, जिल्हायुवाध्यक्ष भाऊसाहेब आव्हाड, कार्याध्यक्ष समीर वीर, जिल्हाध्यक्ष मंजाबापू साळवे, राहुरी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र आल्हाट यांनी म्हंटले आहे.

करोना संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात खासगी हॉस्पिटलमध्ये करोनावर उपचार घेण्यासाठी रुग्णाच्या रागांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहे. अशा महामारीच्या काळात जे खासगी हॉस्पिटल रुग्णांना शासकीय नियमाप्रमाणे बिल आकारून सेवा देत आहेत त्यांचा तालुका दक्षता समितीने सन्मान करावा तर शासकीय नियम बाजूला सारून अवाच्या सव्वा बिल घेणार्‍या खासगी हॉस्पिटलवर कडक कारवाई करावी. त्यामुळे इतर खासगी हॉस्पिटल अवाच्या सव्वा फी घेणार्‍या हॉस्पिटलला चपराक बसेल, अशी मागणी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडे केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com