बिलासाठी मृतदेह ठेवला अडवून

अहमदनगरच्या खाजगी रूग्णालयातील प्रकार
बिलासाठी मृतदेह ठेवला अडवून

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनामुळे मृत झालेल्या एका रूग्णाचा मृतदेह बिलाअभावी 18 तास अडवून ठेवल्याचा प्रकार नगर शहरातील एका खाजगी रूग्णालयात घडला. गुरूवारी दुपारी बारा वाजता भिंगार येथील एका रूग्णाचा नगर शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

एक लाख 13 हजार रूपयांचे बिल भरल्यानतरही अजून एक लाख 14 हजार रूपये भरावे लागतील. त्यानंतरच मृतदेह अंत्यविधीसाठी पाठविण्यात येईल अशी भूमीका रूग्णालय प्रशासनाने घेतली. मृत रूग्णाच्या नातेवाईकांनी शुक्रवारी दुपारी काही पैसे भरल्यानंतर रूग्णालयाने मृतदेह अंत्यविधीसाठी पाठविला. या खाजगी रूग्णालयावर प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न मृत रूग्णांच्या नातेवाईकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

भिंगार येथील राहणार्‍या एका व्यक्तीला करोना संसर्गाचे निदान झाल्याने त्याला उपचारासाठी नगर शहरातील बुरूडगाव रोडवर असलेल्या खाजगी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. त्याठिकाणी रूग्णावर उपचार सुरू असताना नातेवाईकांनी रूग्णालयाचे 45 हजार व मेडिकलचे 68 हजार रूपये बिल भरले होते. गुरूवारी दुपारी त्या रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी रूग्णालय प्रशासनाने नातेवाईकांकडे राहिलेल्या बिलाची मागणी केली.

बिल भरल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी पाठवू अशी भूमीका रूग्णालय प्रशासनाने घेतली. रूग्णालयाचे 69 हजार व मेडिकलचे 45 हजार रूपये बिल भरण्याचे त्यांनी नातेवाईकांना सांगितले. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत या रूग्णालयाने मृतदेह अंत्यविधीसाठी पाठविला नाही. शेवटी शुक्रवारी काही पैसे भरल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी पाठविण्यात आला. दरम्यान, एका छापील बिल बुकवर रूग्णांच्या नातेवाईकांना बिल देण्यात आले होते. त्यावर रूग्णालयाचा सही, शिक्का नसल्याचा आरोप रूग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. यावर प्रशासन दखल घेऊन त्या रूग्णालयावर कारवाई करणार का? असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.

करोना रूग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यापूर्वी किंवा करोना रूग्णाचा मृत्यू झाल्यास रूग्णालयाकडून आकारण्यात आलेल्या बिलांचे ऑडिट महापालिकेकडून केले जाते. यासाठी शहरातील सर्व खाजगी रूग्णालयात मनपाने आपले अधिकारी नियुक्त केले आहे. तरीही रूग्णालयांकडून वाढीव बिले आकारण्यात येत आहे. मृतनंतरही रूग्णालयांकडून हेडसाळ सुरू असल्याचा प्रकार नगरमध्ये सुरू आहे. मनपा प्रशासनाकडून फक्त घोषणा केली जाते. त्याची अंमलबजावणी होत नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com