खासगीचं करोना पॅकेज 75 हजार अन् बिल दिलं दीड लाख
सार्वमत

खासगीचं करोना पॅकेज 75 हजार अन् बिल दिलं दीड लाख

11 दिवसांत 33 किट!

Arvind Arkhade

अहमदनगर|Ahmednagar|संदीप जाधव

करोनाबाधितांची तपासणी करताना 11 दिवसांच्या काळात डॉक्टरांनी 33 पीपीई किट वापरल्या. बेड सॅनिटाइज करण्याचा खर्चही तीनशे रूपये रोज लावण्यात आलाय. 75 हजाराचं पॅकेज सांगणार्‍या खासगी डॉक्टरांनी प्रत्यक्षात मात्र तब्बल दीड लाखाचे बिल करोनाग्रस्ताच्या माथी मारले असल्याचा धक्कादायक प्रकार 'नगर टाइम्सच्या' पाहणीत आढळून आलाय.

खासगी हॉस्पिटल कोरोनाग्रस्तांची कशी लूट करत आहे, याचा पुरावाच नगर टाइम्सच्या हाती लागला आहे. शासकीय दरपत्रक डिक्लेअर करत कलेक्टरांनी कितीही आदेश काढले तरी त्यास खासगी डॉक्टर जुमानत नसल्याचे आज स्पष्ट झाले. बालिकाश्रम रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. अ‍ॅडमिट करताना 75 हजार रुपयांचे 10 दिवसांचे पॅकेज हॉस्पिटलने सांगितले. प्रत्यक्षात डिस्चार्जच्या वेळी मात्र दीड लाखाचे बिल हातात टेकवले.

शासकीय नियमानुसार दररोजचे अडीच हजार रुपये बेड चार्जेस हॉस्पिटलने आकारले खरे, पण इतर खर्च दाखवित 11 दिवसांत कोरोनाग्रस्ताकडून तब्बल 1 लाख 47 हजार रुपये वसूल केले. नर्सिग तपासणी म्हणून दररोज 1 हजार 200 रुपये चार्जेस लावण्यात आले आहे. खासगी डॉक्टर कोरोनाग्रस्तांची तपासणी करताना संरक्षण म्हणून पीपीई किट वापरतात.

एका किटची किंमत 800 रुपये लावण्यात आली आहे. 11 दिवसाच्या काळात या पेशंटची तपासणी डॉक्टरांनी किती वेळेस केली हे त्यांनाच माहिती! पण तपासणीसाठी तब्बल 33 वेळा पीपीई किट वापरल्याचे बिलात दिसून आले. करोनावर कोणतेही औषध नसले तरीपण 36 हजार रुपयांचे मेडिकल बिल लावण्यात आले आहे. बेड सॅनिटाइज करण्याकरीता दररोज 300 रुपये खर्च दाखविण्यात आला आहे.

खासगी डॉक्टरांकडून करोनाग्रस्तांची लूट सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. एका करोनाग्रस्ताने त्याची कैफियत नगर टाइम्सकडे मांडली, डॉक्टरांनी त्याला दिलेले बीलही पेशंटने नगर टाइम्सला दिले.

या हॉस्पिटलच्या खासगी कोविड सेंटरमध्ये आणखीही पेशंट आहेत. मात्र, प्रत्येकाच्या तपासणीवेळी डॉक्टरांनी नवीन पीपीई कीट वापरल्या का, असा सवाल रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

- बेड चार्जेस 2500 रुपये रोज

- नर्सिग 1200 रुपये रोज

- डॉक्टर तपासण 2500 रुपये रोज

- पीपीई किट 800 रुपये (1 नग)

- जेवणाचा खर्च 600 रुपये रोज

- सॅनिटाइझर 300 रुपये रोज

- मेडिकल चार्जेस 36566

- लॅॅब चार्जेस 6150

रुग्ण महिलेचा पतीचे नुकतेच निधन झाले. मात्र, खबरदारी म्हणून ही बाब महिलेला सांगण्यात आलेली नाही. मात्र, सत्य समजल्यावर रुग्ण महिलेची काय अवस्था होईल या चिंतेत नातेवाईक आहेत. त्यातच हे आवाक्याबाहेरचे बिल डॉक्टरांनी माथी मारल्याने त्यांच्यावर दुहेरी संकट ओढवले आहे. रुग्णाचे नातेवाईक हॉस्पिटलच्या वाढीव बिलाबाबत प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे समजते.

करोनाकाळात सेवा देणार्‍या स्टाफला डबल पगार द्यावा लागतो. हॉस्पिटलमधील चार डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर येथेच उपचार सुरू आहे. त्यामुळे आता कोवीड सेंटरच बंद करण्याचा विचार सुरू आहे, असे अजब उत्तर त्या खासगी हॉस्पिटलच्या संचालक डॉक्टरांनी करोनाग्रस्ताच्या नातेवाईकाला दिले.

Deshdoot
www.deshdoot.com