'खाजगी' लुटीवर तहसीदार करणार कारवाई
सार्वमत

'खाजगी' लुटीवर तहसीदार करणार कारवाई

नियंत्रणाची जबाबदारी गटविकासअधिकारीकडे

Dnyanesh Dudhade

Dnyanesh Dudhade

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

खाजगी रुग्णालयांतून करोना रुग्णावर उपचारांसाठी आकारण्यात येणारे शुल्क आणि महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत करण्यात येणारे उपचार आणि मिळणारे लाभ याची तपासणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत.

या भरारी पथकात तीन सदस्य असून या भरारी पथकाच्या अध्यक्षपदी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी असणार आहेत. तर दोषी आढळणार्‍या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे अधिकार तहसीलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी साथ रोग अधिनियम 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यातील रुग्णालयांकडून कोव्हिड बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणारे शुल्क व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना,

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत करण्यात येणारे उपचार व योजनेचा लाभ आदी बाबतची तपासणी करणेकामी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तीन सदस्यीय अधिकार्‍यांचे भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.

या तालुकास्तरीय भरारी पथकाच्या अध्यक्षपदी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी असणार आहेत. तर सदस्य सचिव म्हणुन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी काम पाहणार आहेत. तर सदस्य म्हणुन पंचायत समितीचे लेखाधिकारी यांची नेमणुक केली आहे.

या नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने तालुक्यातील कोवीड बाधीत रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयांना अचानक भेट देवून राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन होत आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. खाजगी रुग्णालयांनी राज्य शासनाची नमूद अधिसूचना व अधिसूचित दर दर्शनी भागावर रुग्णांना व नातेवाईकांनी दिसेल अशा ठिकाणी लावले आहे किंवा कसे याबाबत तपासणी करावी.

खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी देयके अंतिम करण्यापूर्वी सदर देयकांची तपासणी करावी. विहित दरापेक्षा जास्त देयके आकारण्यात येतात किंवा कसे याबाबत तपासणी करावी, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्व खाजगी रुग्णालयांनी दाखल होणार्‍या रुग्णांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात येते किंवा कसे याबाबत तपासणी करावी.

भरारी पथकाने तालुक्यातील रुग्णालयांची तपासणी करून तपासणी अहवाल तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक यांचेकडे सादर करावा, तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक यांनी भरारी पथकाकडून प्राप्त अहवालानुसार शासन निर्णयामध्ये नमुद विहित दरापेक्षा जास्त देयकाची आकारणी करणार्या व महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ न देणार्या रुग्णालयांवर कारवाई करावी, असे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. तसेच या पथकाने कारवाई न केल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com